पारंपरिक तळ्यांतच गणेशमूर्ती विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सातारा - मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून पारंपरिक मंगळवार व मोती तळ्यातच मूर्ती विसर्जन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय आज पालिकेत झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत झाला. शहरातील गणेश मंडळांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी यापुढे मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ पालकत्वाची भूमिका पार पाडेल, असे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी सांगितले.

सातारा - मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून पारंपरिक मंगळवार व मोती तळ्यातच मूर्ती विसर्जन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय आज पालिकेत झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत झाला. शहरातील गणेश मंडळांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी यापुढे मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ पालकत्वाची भूमिका पार पाडेल, असे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी सांगितले.

पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात पालिकेचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, विरोधी पक्ष नेते श्री.  मोने, गट नेत्या स्मिता घोडके, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, माजी उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब बाबर, तसेच शहरातील विविध राजकीय पक्ष व गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीपासून सर्वच वक्‍त्यांनी मंगळवार व मोती तळ्यात मूर्ती विसर्जन करावे. ही पारंपरिक ठिकाणेच अधिक सोईची व सुरक्षित असल्याचा मुद्दा लावून धरला. कृत्रिम तळ्यांचा खर्च न परवडणारा व अनाठाई आहे. न्यायालयाने कोणत्याही तळ्यात मूर्ती विसर्जनास बंदी घातली नाही. मंगळवार तळ्यातील विसर्जनाबाबत राजघराण्याशी चर्चा करून परवानगी घ्यावी. मूर्ती विसर्जनानंतर आठ दिवसांत तळ्यातील गाळ काढण्याची काळजी पालिका प्रशासनाने घ्यावी, असे मुद्दे प्रामुख्याने मांडण्यात आले.

प्रशासनाने विसर्जनानंतर तळ्यांची स्वच्छता तातडीने हाती घ्यावी. गणेश विसर्जनानंतर कोणीही तळ्यांकडे फिरकत नाही, असा पूर्वानुभव आहे. स्थानिक रहिवाशांना प्रदूषणाचे दुष्परिणाम सहन करावे लागतात, असे मत माजी नगरसेविका हेमांगी जोशी यांनी व्यक्त केले. 

नगरध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली शहरातील गणेश मंडळांची सर्वसमावेशक समिती करून या समितीकडे विसर्जन स्थळ निश्‍चितीचे अधिकार सोपवावेत, अशी सूचना नगरसेवक ॲड. दत्ता बनकर यांनी केली. सुहास राजेशिर्के व अशोक मोने यांनी ही सूचना उचलून धरली. पारंपरिक तळीच मूर्ती विसर्जनासाठी अधिक योग्य असल्याने राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्याशी चर्चा करून मंगळवार तळ्याबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी सभेत स्पष्ट केले. स्मिता घोडके यांनी आभार मानले. 

मूर्ती विसर्जनाच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी आज ही बैठक होत असताना नगराध्यक्षा गैरहजर आहेत. प्रश्‍नाचे गांभीर्य नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावे. 
- अमोल मोहिते, नगरसेवक व अध्यक्ष,  धर्मवीर संभाजीराजे जिमखाना, सातारा

Web Title: Ganesh visarjan in the traditional lake in satara