गणेशोत्सव, मोहरमला यंदा ऐक्‍याचा साज

सुधाकर काशीद
मंगळवार, 24 जुलै 2018

३२ वर्षांनंतर एकत्र सोहळे; कोल्हापुरात तालमींमध्ये धामधूम
कोल्हापूर - गणेशोत्सव व मोहरम हे दोन सोहळे तब्बल ३२ वर्षांनंतर यंदा एकाच वेळी येत असल्याने कोल्हापुरातल्या तालमींमध्ये एक वेगळीच धामधूम सुरू झाली आहे. इथल्या प्रत्येक तालमीत गणेशोत्सवात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते. मोहरमच्या काळात त्याच श्रद्धेने पंजाचेही (पीर) पूजन होते. कोल्हापुरातील साधारण ६१ तालमींत यंदा गणेशोत्सव व मोहरम एकत्रित साजरा होणार आहे.

यंदा गणेशोत्सव व मोहरम एकाचवेळी असल्याने त्यांची प्रतिष्ठापना एकत्रित होणार आहे. 

३२ वर्षांनंतर एकत्र सोहळे; कोल्हापुरात तालमींमध्ये धामधूम
कोल्हापूर - गणेशोत्सव व मोहरम हे दोन सोहळे तब्बल ३२ वर्षांनंतर यंदा एकाच वेळी येत असल्याने कोल्हापुरातल्या तालमींमध्ये एक वेगळीच धामधूम सुरू झाली आहे. इथल्या प्रत्येक तालमीत गणेशोत्सवात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते. मोहरमच्या काळात त्याच श्रद्धेने पंजाचेही (पीर) पूजन होते. कोल्हापुरातील साधारण ६१ तालमींत यंदा गणेशोत्सव व मोहरम एकत्रित साजरा होणार आहे.

यंदा गणेशोत्सव व मोहरम एकाचवेळी असल्याने त्यांची प्रतिष्ठापना एकत्रित होणार आहे. 

मोदक, खीर, मिठाईबरोबर मोहरममधला मलिदाही असेल. ढोल-ताशांच्या कडकडाटाबरोबरच मोहरममधील पारंपरिक वाद्यांचा ‘ढौल्या पी पी’ हा तालही निनादत राहील. सामाजिक व धार्मिक ऐक्‍याचे हे प्रतीक थाटामाटात साजरे करण्यासाठी कोल्हापुरात तयारीला वेग आला आहे. 

११ सप्टेंबरला मोहरमच्या पंजाची व १३ सप्टेंबरला श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. याकाळात किमान सात दिवस गणेशमूर्ती व पंजे एकत्रित असणार आहेत. कोल्हापूरच्या धार्मिक, सामाजिक परंपरेचा विचार केला तर त्यात तालमींच्या सहभागाचा वाटा मोठा आहे. 

किंबहुना गणेशोत्सव व मोहरम हे त्या-त्या तालमींच्या, पेठेच्या नावलौकिकाचे प्रतीक आहेत. प्रत्येक तालमीत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना हे येथे गृहितच आहे. पण, दोन तालमी वगळता इतर प्रत्येक तालमीत थाटामाटात मोहरम हे इथल्या धार्मिक परंपरेचे वेगळेपण आहे. किंबहुना प्रत्येक तालमीत मोहरमचा जुना पेटारा आहे. त्या पेटाऱ्यातच मोहरमचे सर्व साहित्य ठेवण्याची पद्धत आहे. 

एरवी गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही सण ठराविक अंतराने येत असल्याने ते स्वतंत्रपणे साजरे होतात. त्यासाठी स्वतंत्रपणे सजावट, धार्मिक विधी, मिरवणुकीचे आयोजन केले जाते. पण, यंदा दोन्ही एकाचवेळी असल्याने त्याच्या आयोजनाची जबाबदारी वाढली आहे. ३२ वर्षांपूर्वी अशा पद्धतीने दोन्ही सोहळे एकत्रित आले होते. हिंदू-मुस्लिम भाविकांच्या एकत्रित गर्दीने शहराला दहा दिवस जत्रेचे स्वरूप आले होते. 

विशेष हे की कोल्हापुरात मोहरम साजरा करण्यात हिंदू भाविकच पुढे असतात; तर गणेशोत्सवात मुस्लिम बांधवही त्याच तन्मयतेने सहभागी होतात. गणेशोत्सवातील देखावे, मिरवणूक पाहण्यासाठी सारे शहर रस्त्यावर येते. तसे मोहरमचा पंजा भेट सोहळा, खत्तल रात्र व विसर्जनासाठी गर्दी होते. किंबहुना गणेशोत्सवासारखेच लखलखाटाचे स्वरूप मोहरमला आले आहे.

बाबूजमालमधील नाल्या हैदर केंद्रबिंदू
बाबूजमाल तालमीतील ‘नाल्या हैदर’ या नावाने ओळखला जाणारा पंजा मोहरमचा केंद्रबिंदू असतो. त्याच्या दर्शनाला कोल्हापूरकर जातातच. हा पंजा जेथे बसविला जातो, त्याच्या शेजारीच गणेशमूर्तीची व त्याच्या शेजारीच शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना केली जाते. त्याला संस्थानकाळापासून राजवाड्यावरून नैवेद्य येतो. संस्थानकाळातील काचेच्या ७० हून अधिक हंड्या, झुंबर, मोठ्या आरशांनी हॉल (सोपा) सजविला जातो. 

१९५६ पासून नियोजन
बाबूजमाल तालमीतील मोहरमचे नियोजन १९५६ पासून जयवंतराव जाधव-कसबेकर व इब्राहिम अल्लाबक्ष सय्यद तालमीच्या परिसरातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करतात.  तत्पूर्वी, त्यांचे वडील दत्तोबा विठोबा जाधव हे नियोजन करीत होते. गणेशोत्सवाच्या सोहळ्याचे नियोजनही तालमीचे सर्व कार्यकर्ते करतात. त्यात हिंदू-मुस्लिम उत्साहाने सहभागी होतात. 

६१ तालमींत होणार प्रतिष्ठापना
कोल्हापुरातील साधारण ६१ तालमींत यंदा गणेशोत्सव व मोहरम एकत्रित साजरा होणार आहे. काही ठिकाणी दोन्ही एका हॉलमध्ये, काही ठिकाणी मंडप घालून त्याचे नियोजन असणार आहे. खत्तल रात्र म्हणजे पंजे मिरवणुकीची रात्र व देखावे पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीची रात्र हे एकाचवेळी असल्याने एक वेगळा माहोल शहरात असेल.

Web Title: ganeshotsav mohram celebration aikya