शंभरी ओलांडल्यानंतरही सरपंच गंगूबाई सक्षमपणे करतात गावचं नेतृत्व

शंभरी ओलांडल्यानंतरही सरपंच गंगूबाई सक्षमपणे करतात गावचं नेतृत्व

ढेबेवाडी : वयाची शंभरी ओलांडलेल्या आजीबाई गावचं सक्षमपणे नेतृत्व करत आहेत, असे जर एखाद्याला सांगितले, तर त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र, पाटण तालुक्‍यातील कोळेकरवाडीत हे प्रत्यक्षात घडले आहे. तेथील गंगूबाई शंकर कोळेकर यांनी शंभरीतही गावची सरपंचकी सांभाळत समाजकार्याला आणि नेतृत्वाला वयाचे बंधन नसते हेच जणू सिद्ध करून दाखवले आहे. दीड वर्षापासून सरपंचदाची धुरा सांभाळणाऱ्या या आजीबाईंचा शंभरावा वाढदिवस ग्रामस्थ, कुटुंबिय व नातेवाइकांनी विधायक उपक्रमांनी साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

ढेबेवाडी विभागातील रूवले हे गंगूबाईंचे माहेर. त्या वेळची माहेरकडील परिस्थिती हलाखीची होती. त्या काळी मुलामुलींची लग्ने कमी वयात व्हायची. वयाच्या दहाव्या वर्षी गंगूबाईंच्या आई-वडिलांनी लेकीच्या कपाळावर मोंडवळ्या बांधल्या. माथाडी कामगार आणि पहिलवान असलेले पती शंकरराव यांच्यासमवेत खांद्याला खांदा लावून संसार करताना प्रसंगी परिस्थितीशी चार हात करत त्यांनी मोठ्या कष्टाने संसार उभा केला. 1974 मध्ये पतीच्या आकस्मिक निधनानंतर मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने आदी कौटुंबिक जबाबदाऱ्या गंगूबाईंनी सक्षमपणे पेलल्या. गावातील सामाजिक, धार्मिक कार्यातून हिरिरीने सहभाग असणाऱ्या गंगूबाई गावात गंगाई म्हणून सर्वांना परिचित आहेत. 

कुटुंब स्थिरस्थावर झाल्यावर थोडे दिवस का होईना गावाचा कारभार करण्याचे त्यांनी पाहिलेले स्वप्न अलीकडे पूर्ण झाले. ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून गेल्यानंतर दीड वर्षापूर्वी सर्वानुमते सरपंचपदी त्यांची वर्णी लागली. यानिमित्ताने वयाच्या शंभरीतही गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व गावाला मिळाले. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत विविध कामे मार्गी लावल्याचे आणि पाणीप्रश्नही सोडविल्याचे सांगतानाच अजूनही मला खूप काम करायचे आहे. गावाला विकासाभिमुख आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणायचे आहे, हे सांगायलाही गंगूबाई विसरत नाहीत. या वयातही त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. स्वतःच्या जीवनातील अनेक लहान-मोठे प्रसंग त्या अगदी अचूकपणे सांगतात. 

सकाळी साडेपाचला त्यांचा दिनक्रम सुरू होतो. देवदर्शनानंतर काठीच्या आधाराने गावातून फेरफटका मारताना जाणून घेतलेल्या अडीअडचणी त्या ग्रामपंचायतीतील आपल्या सहकाऱ्यांच्या कानावर घालतात. ग्रामपंचायतीच्या बैठका व ग्रामसभांतूनही त्या प्रश्नांना तोंड फोडतात. शंभरी गाठल्यानंतरही गोळ्या औषधांपासून त्या चार हात दूरच आहेत. त्यातूनही ताप, सर्दी व खोकल्याने गाठल्यास स्वतःच्याच माहितीतून झाडपाल्याची औषधे घेण्याकडे त्यांचा कल असतो. वयोमानामुळे सर्व दात पडले असले तरी हिरड्यांच्या आधाराने त्या जेवण करतात. गावगाडा संभाळताना कुटुंबीयांचाही भक्कम आधार त्यांच्या पाठीशी आहे. 

गंगूबाईंच्या  शंभराव्या वाढदिवशी मोठा गोतावळा उपस्थित होता. वाढदिवसानिमित्त सकाळी देवदर्शनानंतर घरी धार्मिक पूजाही झाली. गहू, तांदूळ व ज्वारीने त्यांची धान्यतुला करून ते धान्य काही कुटुंबांना वाटण्यात आले. ग्रामस्थांना भेटवस्तूच्या स्वरूपात भांडी वाटपही झाले. या धावपळीतूनही थोडा वेळ काढून त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन आल्याच. योग्य आहार, निश्‍चित दिनक्रम, व्यायाम व हसत खेळत तणावमुक्त जगणे हेच आपल्या दीर्घायुष्याचे आणि ठणठणीतपणाचे गुपित असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आयुष्यात खूप कष्ट सोसलं, पण डगमगले न्हाय. गावाची सेवा हातातनं घडणं ह्ये तसं पुण्याचंच काम हायं. माझ्या जीवनात ते भाग्य हुतं म्हणूनच घडून आलं. आता सारं जीवनच सत्कारणी लागल्यासारखं वाटतयं. - गंगूबाई कोळेकर (सरपंच, कोळेकरवाडी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com