सांगलीत खाकी वर्दीतले गॅंगवॉर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

चाकू, तलवारींसह फिल्मी स्टाइल हाणामारी

चाकू, तलवारींसह फिल्मी स्टाइल हाणामारी
सांगली/जयसिंगपूर - येथील शहर ठाण्यातील दोन पोलिस आणि त्यांच्या समर्थक गुंडांमध्ये सोमवारी मध्यरात्री तुंबळ हाणामारी झाली. अंकली आणि उदगाव हद्दीत तलवारी, चाकू, काठ्यांसह पोलिस व त्यांच्या गुंडांची फौज एकमेकांवर तुटून पडली. "बॉलिवूड स्टाइल' मोटारीतून अपहरण, पाठलाग आणि हाणामारी असा थरार पाहायला मिळाला. हल्ल्यात संतोष पाटील व किरण पुजारी या दोन पोलिसांसह तिघेजण गंभीर; तर चौघेजण किरकोळ जखमी झाले.

येथील सांगली शहर पोलिस ठाण्यातील पाटील व पुजारी या दोन पोलिसांत मागील काही दिवस सुरू असलेला वाद सोमवारी मध्यरात्री उफाळून आला. अंकली (ता. मिरज) व उदगाव (ता. शिरोळ) पाटील व पुजारीच्या समर्थक गुंडांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी सांगली ग्रामीण व जयसिंगपूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, अपहरण, आर्म ऍक्‍टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खाकी वर्दीतील गुंड आणि गुंड साथीदारांच्या हाणामारीमुळे जिल्ह्याच्या वेशीवरच वर्दीची लक्तरे टांगली गेल्याचे चित्र दिसून आले.

सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अरुण आनंदराव हातंगळे याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस शिपाई किरण राजाराम पुजारी, राजाराम बाळू पुजारी, रोहित सतीश पाटील, ओंकार पोपटराव मगदूम, ओंकार दिलीप माने, सुरेश ऊर्फ दादू सोमनाथ बंडगर यांना अटक करण्यात आली. दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सागर पुजारी फरारी आहे.

Web Title: gangwar in police