सकाळी गॅस पेटवला अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

- गॅस सिलेंडरचा स्फोट
- पाचजण झाले जखमी
- भारत गॅसच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट

सोलापूर : गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच कुटूंबातील चौघेजण आणि शेजारच्या घरातील एक तरुण जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास होटगी रस्त्यावरील बसवेश्‍वर नगर येथे घडली. 

अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट
सुरेश भानुदास माने (वय 32), सविता सुरेश माने (वय 27), शुभांगी सुरेश माने (वय 7), विठ्ठल सुरेश माने (वय 10, सर्व रा. बसवेश्‍वर नगर, होटगी रोड, सोलापूर), तसेच शेजारी राहणारा श्रीकांत हडपद अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास सविता माने या पाणी गरम करण्यासाठी गॅस पेटवत होत्या. त्यावेळी अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे माने यांच्या घरावरील आणि शेजारच्या घरावरील पत्रा उडून बाजूला पडला. या घटनेनंतर घाबरलेल्या माने व हडपद कुटूंबांतील सदस्य पळत बाहेर आले. माने कुटूंबातील चौघांना नातेवाईक चंदू माने यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर भारत गॅसच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद सिव्हील हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे.

महिलेची 48 हजारांची ऑनलाईन फसवणूक 
हरियाणा येथील गुडगावमधून ऑनलाईन शॉपिंग करून सोलापुरातील महिलेची फसवणूक केली आहे. याबाबत सुलोचना सातप्पा हुडकर (वय 46, रा.लक्ष्मी नगर, बाळे, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. हुडकर यांचे स्टेट बॅंकेच्या ट्रेझरी शाखेमध्ये खाते आहे. हुडकर यांच्या बॅंक खात्याची माहिती घेवून त्यांच्या खात्यामधून हरियाणा येथील गुडगाव येथे ऑनलाईन शॉपिंग केली आहे. ही घटना 2 जून आणि 9 जून रोजी घडली आहे. हुडकर यांच्या खात्यातून एकूण 48 हजार 956 रुपये ऑनलाईन पद्धतीने खर्च केले आहेत. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas cylinder spot at solapur