'हे' केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बॅंका, बाजार समिती, सूतगिरणी यांचे सर्व संचालक, 25 हजारांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी, कर्मचारी हे कर्जमाफीस पात्र ठरणार नाहीत.

सातारा : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक टप्प्यात कर्ज खात्याला आधारकार्ड जोडले जात आहे.

जिल्ह्यातील 12 हजार 708 शेतकऱ्यांची आधारकार्डची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. दरम्यान, आगामी काळात पोर्टलवर फक्त पात्र थकीत कर्जदार शेतकऱ्यांची यादी दिसण्यासाठी ट्रॅक लावण्यात आलेले आहेत. येत्या एक फेब्रुवारीपर्यंत अंतिम यादी पोर्टलवर प्रसिद्ध होईल, असे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात येत आहे.

वाचा : राजे ठाकरेंच्या भेटीची चर्चा
 
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला आहे. सुरवातीला दोन लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्यांचा माफीत समावेश केला. हे पैसे शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर भरले जाणार आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून यादी करण्याचे काम सुरू आहे.

कर्जदार शेतकऱ्यांचे आधार लिंकअप तपासण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात 12 हजार 708 शेतकऱ्यांच्या आधारची माहितीच संबंधित बॅंकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे आधारकार्ड काढून घेऊन त्याचे लिंकअप केले जाणार आहे. त्यानंतर दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या सर्व बॅंकांकडील शेतकऱ्यांची यादी मागविण्यात आली. या यादीची तपासणी करण्यात आली. ही यादी पोर्टलवर टाकण्यापूर्वी विकास सेवा सोसायटी व बॅंकांकडे ही यादी अवलोकनार्थ देण्यात आली आहे. त्यानुसार ही यादी गावातील सोसायट्यांच्या कार्यालयात जनतेला पाहाण्यासाठी लावण्यात आली आहे.

नक्की वाचा -  चालून आलेली हज़ारोंची लक्ष्मी धनाजीने प्रामाणिकपणे परत केली

या यादीत अनेक फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. शासनाकडून एक फेब्रुवारीपर्यंत शासकीय कर्जमाफीचे पोर्टल सातारा जिल्ह्याला ओपन करून मिळेल, त्यावर ही यादी टाकण्यात येणार आहे. यादी पोर्टलवर पडत असताना त्याला विविध फिल्टर्स लावण्यात आले आहेत.

त्यामुळे केवळ शासन निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचीच यादी पोर्टलवर दिसणार आहे. अपात्र शेतकऱ्यांची नावे आपोआप वगळली जातील. त्यामुळे आता जरी यादीत एखाद्याचे नाव दिसत असले, तरी त्याचे नाव पोर्टलवर अंतिम यादी म्हणून पडताना ते वगळले जाईल, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. 

यादीत होणार हे अपात्र 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बॅंका, बाजार समिती, सूतगिरणी यांचे सर्व संचालक, 25 हजारांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी, कर्मचारी.

हेही वाचा -  Video : मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी...नहीं चलेगी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To Get Loan Waiver Farmers Must Link Aadhar Card With Bank