Video : मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी...नहीं चलेगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी शहरातून मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील महिला व नागरिक सहभागी झाले होते.

सातारा : मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी...नहीं चलेगी, बिल हटाओ, देश बचाओ..., इन्कलाब जिंदाबाद..., मोदी हटाओ, देश बचाओ..., छिन के लेंगे आझादी... अशी घोषणाबाजी करत जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने "जेएनयू'च्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध, संविधानाच्या सन्मानार्थ, नागरिकत्व कायदा दुरुस्तीचे बिल रद्द करण्याची मागणी करत सातारा शहरातून मोर्चा काढला.  

केंद्राने नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून त्याची अंमलबजावणी देशभर सुरू केली आहे. या विधेयकातील दुरुस्तीस मुस्लिम समाजाचा विरोध आहे. एनआरसी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी सातारा शहरातून भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

नक्की वाचा - सादिक शेखने केले क्षणांत 50 हजार परत

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हुतात्मा स्मारकातील पुतळ्यापासून मोर्चास सुरवात झाली. हा मोर्चा छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलासमोरून बस स्थानक तेथून पोलिस मुख्यालयाजवळून शाहू चौकात आला. तेथून रयत शिक्षण संस्थेसमोरून पोवई नाक्‍यावर आला व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

मोर्चात सहभागी मुस्लिम समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यात मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, बिल हटाओ, देश बचाओ, इन्कलाब जिंदाबाद, मोदी हटाओ, देश बचाओ, छिन के लेंगे आझादी, मूलनिवासीयोंका नारा है, भारत देश हमारा है, संविधान के सन्मानमें मुस्लिम समाज मैदान में, सीएए हटाओ, देश बचाओ आदी घोषणांचा समावेश होता.

वाचा : राजे ठाकरेंच्या भेटीची चर्चा

त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चात मुस्लिम समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim Community Protest Against NRC And CAA In Satara