डॉ. प्रकाश शहापूरकर यांना घाळी समाजभूषण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

गडहिंग्लज - येथील डॉ. घाळी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा घाळी स्मृती समाजभूषण पुरस्कार यंदा गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश शहापूरकर यांना जाहीर झाला. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

गडहिंग्लज - येथील डॉ. घाळी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा घाळी स्मृती समाजभूषण पुरस्कार यंदा गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश शहापूरकर यांना जाहीर झाला. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

डॉ. एस. एस. घाळी यांच्या जयंतीनिमित्त 24 ऑगस्ट रोजी घाळी सभागृहात दुपारी तीनला व्हाईस कल्चर समुपदेशक निनाद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

या वेळी काळे यांचे हरवत चाललेला संवाद व अस्वस्थ समाजमन या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. शहापूरकर यांचे वैद्यकीय, सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून त्यांची पुरस्काराची निवड केली आहे. सन्मानचिन्ह, रोख 25 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

सतीश घाळी म्हणाले, ""विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी घाळी प्रतिष्ठान विविध उपक्रम राबविते. डॉ. घाळी यांच्या जयंतीदिनी सहकार, उद्योग, कृषी, शिक्षण, समाजसेवा आदी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. डॉ. घाळी यांच्या कार्याच्या स्मृती सर्वांना प्रेरणादायी ठराव्यात यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत 19 जणांना हा पुरस्कार दिला आहे.'' 

संजय बटकडलीही माहिती दिली. प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी स्वागत केले. प्राचार्य सी. एस. मठपती यांनी आभार मानले. उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक किशोर हंजी, प्रा. सुभाष शिरकोळे, दत्तात्रय बरगे, अनंत कुलकर्णी, गणपतराव डोंगरे, रमेश पाटील, सुनिल देसाई, मानसिंगराव देसाई, पांडूरंग चव्हाण, मल्हार शिंदे आदी उपस्थित होते. 

1964 ते 2014 या कालावधीत विद्या प्रसारक मंडळाने अनेक विद्याशाखांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य केले आहे. भविष्यात कौशल्य शिक्षण, तंत्र शाखेसह नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. 
- डॉ. सतीश घाळी,
कार्याध्यक्ष, विद्या प्रसारक मंडळ 

Web Title: Ghali award to Dr Prakash Shahapurkar