कोल्हापुरातील भवानी मंदिरात सापडली ‘नकुशी’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

कोल्हापूर - भवानी मंडपात आज सकाळी पाणी भरताना गजरे विक्रेते प्रकाश पाटील यांच्या कानावर अर्भकाच्या रडण्याचा आवाज पडला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मंदिराच्या कठड्यावरून आवाज येत होता. मंदिराबाहेर कुत्र्यांचं टोळकं भुंकत होतं. ते आवाजाच्या दिशेने धावले.

कोल्हापूर - भवानी मंडपात आज सकाळी पाणी भरताना गजरे विक्रेते प्रकाश पाटील यांच्या कानावर अर्भकाच्या रडण्याचा आवाज पडला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मंदिराच्या कठड्यावरून आवाज येत होता. मंदिराबाहेर कुत्र्यांचं टोळकं भुंकत होतं. ते आवाजाच्या दिशेने धावले.

एका चिमुकलीला कपड्यात गुंडाळून कठड्यावर ठेवल्याचे पाहिले. त्यांनी तिला कडेवर घेत तिचे आई-वडील कोण याची शोधाशोध केली. मात्र, कोणी सापडलं नाही. चिमुकलीचं रडणं थांबत नव्हतं. तिला येथील विक्रेत्या वैशाली चव्हाण यांनी साखरपाणी पाजले आणि पोलिसांच्या मदतीने सीपीआरमध्ये दाखल केले.

देवकर पाणंद येथील प्रकाश अरविंद पाटील भवानी मंडपात गजरे विकतात. आज सकाळी सहाच्या सुमारास ते भवानी मंदिराशेजारील चावीवर पाणी भरत होते. तेथे काही कुत्री मंदिराच्या दारात घुटमळत होती आणि आतून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी आवाजाच्या दिशेने कानोसा घेतला. त्यांना मंदिराच्या बाहेरील कठड्यावर कापडात लहान चिमुकली गुंडाळल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने तिला उचलून शांत करण्याचा प्रयत्न केला.

हे बाळ कोणाचं आहे, याची विचारणा सुरू केली. त्यांनी मंदिरासह परिसर पिंजून काढला; मात्र कोणी सापडलं नाही. नंतर जुना राजवाडा पोलिसांना माहिती दिली. त्यांच्यासह नागरिकही त्यांच्या मदतीला धावले. चिमुकल्याचा रडण्यामुळे वैशाली चव्हाण बेचैन झाल्या. त्यांनी साखरपाणी करून तिला पाजले. त्यानंतर चिमुकली शांत झाली. अखेरीस पोलिसांच्या मदतीने चिमुकलीला पाटील व चव्हाण यांनी सीपीआरमध्ये दाखल केले. ही चिमुकली कोणाची, तिला कोणी जाणूनबुजून ठेवली का? याचा तपास जुना राजवाडा पोलिस करीत आहेत.

दोघांचा शोध सुरू...
सकाळी मंदिराच्या कठड्यावर एक महिला व पुरुष बसून होते. त्यानंतर ते अचानक गायब झाले. त्यांनीच ही चिमुकली ठेवल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला. त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही आधारे त्यांचा शोध सुरू झाला आहे.

Web Title: Girl Infant found in Bhavani Mandap temple in Kolhapur