मुलाने पाठविली चिठ्ठी अन् दहावीच्या मुलीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

काजल दत्तात्रय पोरे (वय १६, रा. वाखरी) ही वाखरी येथील आश्रमशाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. शाळेच्या आवारात २२ जानेवारी रोजी शाळेतील एका मुलाने मोबाईल नंबर लिहिलेली एक चिठ्ठी तिच्यासमोर टाकली होती. या प्रकाराची माहिती शाळेचे शिक्षक पी. जी. गायकवाड यांनी तिचे वडील दत्तात्रय पोरे यांना देऊन शाळेत भेटायला येण्यास सांगितले.

पंढरपूर : शाळेतील एका मुलाने मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी टाकून छेडछाड करून बदनामी केली म्हणून वाखरी (ता. पंढरपूर) येथील आश्रमशाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने आज आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तात्रय गजेंद्र पोरे यांनी पंढरपूर तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की काजल दत्तात्रय पोरे (वय १६, रा. वाखरी) ही वाखरी येथील आश्रमशाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. शाळेच्या आवारात २२ जानेवारी रोजी शाळेतील एका मुलाने मोबाईल नंबर लिहिलेली एक चिठ्ठी तिच्यासमोर टाकली होती. या प्रकाराची माहिती शाळेचे शिक्षक पी. जी. गायकवाड यांनी तिचे वडील दत्तात्रय पोरे यांना देऊन शाळेत भेटायला येण्यास सांगितले. आज (बुधवार) सकाळी दत्तात्रय पोरे यांनी शिक्षक गायकवाड यांची भेट घेतली असता, त्यांनी तुमच्या मुलीला एक मुलगा मोबाईल नंबरची चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करत होता. तुम्ही पालक आहात. तुमच्या मुलीकडे लक्ष द्या. आमचेही लक्ष आहे, असे सांगितले.

आज दुपारी एक वाजता वडील दत्तात्रय पोरे यांनी आपली दुसरी मुलगी किरण भोसले हिच्यासमोर काजलला बोलावून घेऊन आपली परिस्थिती गरिबीची आहे. तू व्यवस्थित राहा, असे सांगितले. तेव्हा तिने नाना मी तशी नाही. मला विनाकारण चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करून माझी बदनामी केली आहे, असे सांगितले. त्यानंतर दुपारी ४.१५ वाजणेच्या सुमारास बदनामी झाल्याच्या नैराश्‍येतून काजल हिने घरातील किचनच्या खोलीत पत्र्याच्या लोखंडी पाइपला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. श्री. निंबाळकर तपास करीत आहेत.

Web Title: girl suicide in Pandharpur