राजस्थानच्या मुलींची बाजी 

सुनील गर्जे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

राजस्थानच्या खेळाडूंनी पहिला सेट 25-17 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसरा सेट मात्र बंगालच्या खेळाडूंनी 25-22 असा जिंकून 1-1 बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये राजस्थानने सुरवातीपासून आघाडी घेतली.

नेवासे : नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती शिक्षण संकुलात आयोजित 65व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात राजस्थान संघाने गतविजेत्या पश्‍चिम बंगालला 3-1 असे पराभूत केले. मुलींच्या 17 वर्षे वयोगटात विजेतेपद मिळविले. तमिळनाडू संघाने तिसरे बक्षीस मिळविले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे ही स्पर्धा झाली. 

राजस्थानच्या खेळाडूंनी पहिला सेट 25-17 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसरा सेट मात्र बंगालच्या खेळाडूंनी 25-22 असा जिंकून 1-1 बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये राजस्थानने सुरवातीपासून आघाडी घेतली. मात्र, बंगालच्या खेळाडूंनीही चांगले प्रयत्न केल्याने 23-23 बरोबरी साधली. नंतर मात्र राजस्थानच्या खेळाडूंनी संयमाने खेळत हा सेट 27-25 असा जिंकून 2-1 आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्येही राजस्थानच्या खेळाडूंनी बंगालला चोख उत्तर दिले आणि हा सेट 25-21 असा जिंकून विजेतेपद आपल्या नावे केले. 

विजेत्यांना पदक 
त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब घाडगे, त्रिमूर्ती क्रीडा संस्थेच्या अध्यक्ष स्नेहल घाडगे, जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे, मैदानप्रमुख पापा शेख आदींच्या हस्ते विजेत्यांना चषक, पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

तमिळनाडूला कांस्यपदक 
स्पर्धेतील कांस्यपदकासाठी गुजरात विरुद्ध तमिळनाडू असा सामना झाला. त्यातही चांगली चुरस दिसून आली. तमिळनाडू संघाने चांगली सुरवात करून पहिला सेट 25-17 जिंकून आघाडी घेतली. दुसरा सेट फारच रंगतदार झाला. या सेटमध्ये गुजरातने सुरवातीपासून आघाडी घेतली. मात्र, 21-18च्या गुणसंख्येवरून त्यांना हा सेट 25-23 असा गमवावा लागला. तिसऱ्या सेटमध्ये तमिळनाडूच्या खेळाडूंनी कधी हलके ड्रॉप्स, तर कधी जोरदार स्मॅश लगावत 25-21 अशी बाजी मारली नि कांस्यपदक आपल्या नावावर केले. 

31 राज्यांनी घेतला सहभाग 
मैदान प्रमुख पापा शखे म्हणाले, ""जिल्ह्यात पहिल्यांदाच शालेय राष्ट्रीयस्तरावरील हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आला. त्यासाठी 31 राज्यातील संघ स्पर्धेसाठी आले होते. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या स्पर्धा पार पडल्या.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girls of Rajasthan won