‘ग्लो ऑफ होप’ गीताताई उपळेकर यांचे कोल्हापुरात निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर -‘ग्लो ऑफ होप’ या प्रसिद्ध चित्रातील मॉडेल श्रीमती गीताताई कृष्णकांत उपळेकर (वय १०२) यांचे येथे निधन झाले. शाहू नाका येथील वैभव हौसिंग सोसायटीतील घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

कोल्हापूर -‘ग्लो ऑफ होप’ या प्रसिद्ध चित्रातील मॉडेल श्रीमती गीताताई कृष्णकांत उपळेकर (वय १०२) यांचे येथे निधन झाले. शाहू नाका येथील वैभव हौसिंग सोसायटीतील घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. रात्री येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ४) सकाळी नऊला आहे.

म्हैसूरला जाणारे पर्यटक व रसिक जगन्मोहन पॅलेसमधील संग्रहालयाला आवर्जून भेट देतात. भेटीमध्ये राजा रविवर्मा यांनी रेखाटलेली चित्रे पाहतात. संग्रहालयातून बाहेर पडताना जलरंगात हॅंडमेड पेपरवर चितारलेले हातात दीप घेतलेल्या एका तरुणीचे ‘ग्लो ऑफ होप’ हे अप्रतिम चित्र साऱ्यांनाच भुरळ घालते. राजा रविवर्मा यांनीच ते रेखाटल्याची समजूत होती; मात्र हे चित्र प्रख्यात चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांनी रेखाटले आहे. हळदणकर हे मूळचे सावंतवाडीचे. त्यांची जगभरात विविध ठिकाणी प्रदर्शने झाली; मात्र ‘ग्लो ऑफ होप’ ही त्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती ठरली. हळदणकर हे गीताताईंचे वडील.

दिवाळीत पणती घेऊन त्या दारात ठेवण्यास निघाल्या असता त्यांच्या आकृतीने, देहबोलीने व छायाप्रकाशाच्या मोहक खेळाने हळदणकरांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी गीताताईंना तसेच उभे राहायला सांगून चित्र करायला घेतले. गीताताईंना त्याच स्थितीत दीप हाती घेऊन तब्बल साडेतीन तास उभे केले आणि हॅंडमेड पेपरवर जलरंगात ‘ग्लो ऑफ होप’ चित्र आकाराला आले. येथील कृष्णकांत उपळेकरांशी विवाहानंतर गीताताई कोल्हापुरात आल्या. आग्रा घराण्याचे गुरू खादीमसेन खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. गायनातील अनेक पारितोषिकांसह करवीर भगिनी मंडळाच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

सर्वोत्कृष्ट कलाकृती
‘ग्लो ऑफ होप’ चित्र साकारले ते वर्ष होते १९३२. या चित्रासाठी हळदणकरांना स्वातंत्र्योत्तर काळात ललित कला अकादमीची फेलोशिप मिळालीच; पण राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते गौरवही झाला. इटालियन एन्सायक्‍लोपिडियामध्ये या चित्राचा उल्लेख जलरंगात त्या काळामध्ये जगभरात रेखाटलेल्या चित्रातील तीन सर्वोत्कृष्ट चित्रांपैकी एक असा केला आहे.

Web Title: Gitatai Upalekar no more