वेळ द्या, सांगली समजून घ्या...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

भाजपला सांगली जिल्ह्याने चार आमदार आणि एक खासदार दिलाच; पण आता त्यासोबत जिल्हा परिषदही दिली आहे. एवढे देऊन तरी जिल्ह्यावर देवेंद्र प्रसन्न होताहेत काय, याची प्रतीक्षा आहे. येथे झिरो असलेला भाजप आज दोन्ही काँग्रेसवर मात करून हिरो झाला आहे. मात्र भाजपच्या राज्यातील नेतृत्वाकडून या जिल्ह्याची जितकी दखल घेणे अपेक्षित आहे, त्याबाबत उपेक्षाच आहे. शेती व उद्योग क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी पायाभूत गोष्टींच्या निर्मितीला सरकारचे म्हणावे तसे पाठबळ मिळालेले नाही.

दुष्काळी तालुक्‍यांसाठी ठोस असे काही होताना दिसत नाही. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या सिंचन योजनांबाबत सरकारला धोरणच ठरवता येईना, किंबहुना ‘चालतंय तोवर चालवा’, अशीच भूमिका दिसू लागली आहे. सहकारी संस्थांची राखरांगोळी करणाऱ्यांना भाजप आपल्याकडे घेण्यासाठी पायघड्या का घालत आहे हे जनतेला कळेना झालंय. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्राच्या भ्रष्टाचारावर नगरविकासकडूनच पांघरुण घातलं जातंय! गेल्या अडीच वर्षांत एकही भरीव विकासकाम नाही. उलट आता महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून दोन्ही काँग्रेसमधील मिरज पॅटर्नचे भ्रष्ट शिलेदारही भाजपमध्ये घेण्याचे मनसुबे  दिसत आहेत. सत्तेसाठी वाट्टेल ते या न्यायाने गेल्या २० वर्षांत शहरावर नांगर फिरविणाऱ्या सोनेरी टोळीलाही भाजप प्रवेश देणार काय, हा कळीचा मुद्दा आहे. जमेची बाजू एवढीच की, राष्ट्रीय महामार्गांना मंजुरीसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राज्यमार्गांना निधी मिळालाय, बाकी कायदा-सुव्यस्थेपासून ते प्रशासनातील  सजगतेपर्यंत सारे आलबेल नाही. त्यावर ना आघाडी सरकारच्या काळात अंकुश होता, ना आता भाजपच्या काळात आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रत्येक दौरा धावपळीचा असतो; पण सांगलीसाठी थोडा अधिक वेळ देऊन जनतेने दिलेला कौल समजून घेतला तर उपकार होतील !

Web Title: Give time, understand Sangli