लालपरीचे नुकसान टाळण्याकरीता आता काचेला संरक्षण 

तात्या लांडगे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

आंदोलनात होणारी एसटी बसेसच्या काचेची तोडफोड रोखण्याकरिता गाड्यांना लोखंडी जाळ्या बसविण्याच्या सूचना वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत. 

सोलापूर : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा बांधव आक्रमक झाला असून उद्या (ता. 9 ऑगस्ट, गुरुवारी) राज्याव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एसटी बसेसचे नुकसान टाळण्याकरिता राज्य परिवहन विभागाने नवी शक्‍कल लढविली आहे. आंदोलनात होणारी एसटी बसेसच्या काचेची तोडफोड रोखण्याकरिता गाड्यांना लोखंडी जाळ्या बसविण्याच्या सूचना वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत. 

आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर, लिंगायत यासह अन्य जातींच्या समाज बांधवांनीही आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका लालपरीलाच बसला असून आतापर्यंत राज्यभरात सुमारे साडेचारशे बसेसची तोडफोड झाली आहे. तसेच अनेक फेऱ्याही रद्द करण्यात आल्याने आतापर्यंत सुमारे 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले. उद्याच्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी राज्यातील सर्व विभागात विभागप्रमुख, आगारप्रमुख, पोलिस यांच्या बैठका पार पडल्या. राज्य परिवहनच्या दररोज चौदाशे मार्गांवरून एक लाख 4 हजार फेऱ्या होतात. या नव्या क्‍लुप्तीमुळे बहुतांशी प्रमाणात नुकसान टळेल, असा विश्‍वास परिवहनमंत्र्यांनी व्यक्‍त केला आहे. 

वाहतूक महाव्यवस्थापकांच्या सूचना 
- विभाग स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करावा 
- पोलिसांच्या मदतीने व त्यांच्या परवानगीनचे बसेस सोडाव्यात 
- प्रवाशांच्या गर्दीनुसार वाहतुकीचे नियोजन करावे 
- संप, आंदोलन काळात सर्व बसेसना लोखंडी जाळ्या बसवाव्यात 
- एसटी बसेसच्या नुकसानीचे व्हिडिओ चित्रिकरण करावे 
- वाहतूक विस्कळीत झाल्यास पोस्ट, टेलिग्राम विभागाला त्याची माहिती द्यावी 
- फेऱ्या रद्द झाल्यास आरक्षित तिकीटांचा परतावा द्यावा 
- बस चालकाने बस सोडून इतरत्र जावू नये 
- दर दोन तासाला आंदोलनाच्या स्थितीची माहिती द्यावी.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The glass protection to avoid ST Bus damage