'बदलाला आत्मविश्‍वासाने सामोरे जा'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कुडित्रे - तंत्रज्ञानाच्या युगात बदलाला सामोरे जाण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे. जगात रोज बदल घडत आहेत. सर्व क्षेत्रात थ्री डी यंत्रणा येत आहे. नवनवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहेत. याचा विचार करून युवकांनी स्वत:ला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी केले.

कोपार्डे येथे स. ब. खाडे महाविद्यालयात डी. डी. आसगावकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनी युवा संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष शाम कोरगावकर होते. ‘आधुनिक तंत्रज्ञान व युवकांसमोरील आव्हाने’ या विषयावर श्री. पवार यांनी मार्गदर्शन केले.

श्री. पवार म्हणाले, ‘‘युवकांनी बदलाचे भय न बाळगता तंत्रज्ञान आत्मसात करून बदलाला सामोरे जावे. आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे प्रचंड नोकऱ्या निर्माण होत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर आता डाटा ही चौथी गरज बनली आहे. याचा विचार करत विद्यार्थ्यांनी बदलाची गती समजून घ्यावी. अवांतर वाचनावर भर द्यावा. इंटरनेट युगात सोशल मीडियाच्या आचारसंहिता पाळून यंत्रणा हाताळावी.’’

रोटरीचे अध्यक्ष शाम कोरगावकर म्हणाले, ‘‘युवकांनी ध्येय निश्‍चित करून वाटचाल करावी. शैक्षणिक कालावधीत अवांतर वाचन वाढवावे.’’

सचिव प्रा. जयंत आसगावकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती पथनाट्य सादर केले. प्राचार्य डॉ. डी. डी. कुरळपकर यांनी स्वागत केले. परिचय प्रा. एस. पी. चौगले यांनी करून दिला. 

नीता पोवार यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य बी. एल. पाटील यांनी आभार मानले. अध्यक्ष य. ल. खाडे, के. ना. जाधव, डी. एन. कुलकर्णी, डी. जी. खाडे, आनंदा कासोटे, बी. आर. नाळे, प्राचार्य डी. पी. भगत आदी उपस्थित होते.

Web Title: Go confidently deal with change