गो कोरोना गो... नगरकरांच्या थाळीनादाने कोरोना झाला बहिरा, पोलिसदादा, डॉक्टरसाहेब थॅक्स

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

जिल्ह्यातील जनतेने थाळी, शंख, टाळनादासह फटाक्‍यांची आतषबाजी करीत प्रशासनाचे कौतुक केले. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा पुरविणारे कर्मचारी भारावून गेले होते.

नगर ः कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या यंत्रणेला पाठबळ देण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रत्येकाने सायंकाळी घरापुढे उभे राहून थाळीनाद व शंखनाद केला. अनेक ठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजीही करण्यात आली. 

हेही वाचा - नगरकरांसाठी मोठी बातमी - कोरोनाचे १९६ रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य, पोलिस व महसूल यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी "जनता कर्फ्यू'च्या दिवशी सायंकाळी थाळी, टाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिकांनी शंखनाद, तसेच थाळी व टाळ्या वाजवून परिसर दणाणून सोडला. 

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी करून प्रशासकीय यंत्रणेच्या कामाचे कौतुक केले. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या शंख, थाळीनाद व फटाक्‍यांची आतषबाजी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. 

आरोग्य कर्मचारी भारावले 
जिल्ह्यातील जनतेने थाळी, शंख, टाळनादासह फटाक्‍यांची आतषबाजी करीत प्रशासनाचे कौतुक केले. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा पुरविणारे कर्मचारी भारावून गेले होते. नगरकरांनी दाखवलेल्या प्रतिसादामुळे तसेच त्यांच्या थाळीनादामुळे जणू काही कोरोना बहिरा झाला असावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Go Corona Go Corona gets deaf because of Ahmednagar