esakal | म्हादईप्रकरणी लढा तीव्र ; कर्नाटकविरोधात गोवा सरकारची अवमान याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

goa government petition against karnataka sarkar topic of mains water forced to wrong side in belgaum

ही माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे.

म्हादईप्रकरणी लढा तीव्र ; कर्नाटकविरोधात गोवा सरकारची अवमान याचिका

sakal_logo
By
चेतन लक्‍केबैलकर

खानापूर : म्हादईचे पाणी बेकायदा वळविल्याप्रकरणी गोवा सरकारने कर्नाटकविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज अवमान याचिका दाखल केली आहे. ही माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. म्हादईप्रश्न पुन्हा एकदा गोव्याच्या न्याय हक्कासाठी तीव्र न्यायालयीन लढा उभारला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे कर्नाटकाचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. 

हेही वाचा -  बेळगावातील मंगलकार्यालये होणार सुरू

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक सरकारने म्हादईअंतर्गत कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी घिसाडघाई चालविली होती. त्यासाठी लवादाच्या निर्णयनुसार आवश्यक परवान्यांसाठी प्रयत्न सुरू होते. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान खात्यासह जलशक्ती खात्याकडूनही कर्नाटकाला झुकते माप देण्यात आले होते. अलिकडेच मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी दोन्ही खात्यांच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पांना चालना देण्याची मागणी केली होती. केंद्रीय वनखात्यानेच स्वत: पुढाकार घेऊन वृक्षतोडीसाठी पुन्हा अर्ज करण्याची मुभा कर्नाटकला दिली होती. तसेच विधीमंडळाच्या अधिवेशनात 885 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देत प्रकल्पांना सुरूवात करण्याची तयारी कर्नाटकने चालविली होती. 

रविवारी (4) केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात असताना म्हादईप्रश्नी मौन धारण करून गोमंतकीय आणि खानापूर तालुकावासीयांच्या आशेवर पाणी सोडले होते. त्यामुळे गोव्यात विरोधकांनी टीकेची झोड उठविली असतानाच आज मंगळवारी गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. लवादाच्या निर्णयाचा अवमान करीत कर्नाटक म्हादईचे पाणी बळजोरीने मलप्रभेत वळवीत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेमुळे कर्नाटकाच्या घिसाडघाईला विराम मिळणार आहे. या याचिकेमुळे गोमंतकीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

हेही वाचा -  बेळगावातून आंतरराज्य बससेवा आता मध्यरात्रीपर्यंतही 


तरीही पाणी वळविणे सुरूच

2018 पूर्वीच कर्नाटकाने खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथील कळसा प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण केले आहे. म्हादई जलतंटा लवादाने प्रकल्पाला स्थगिती दिली असतानाही कर्नाटकाने याबाबत अक्रस्ताळेपणा केला. दोन वर्षांपासून पावसाळ्यात या प्रकल्पातील पाणी मलप्रभेत वळविले जात आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मलप्रभेत करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. लवादाच्या आदेशानुसार कालवा बंद करण्यात आला असला तरी चोर मार्गाने पाणी वळविले जात आहे.

संपादन - स्नेहल कदम