शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रथमच छावण्या

Goat
Goat

मुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्या वेळी हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

राज्यात लहान व मोठ्या जनावरांसाठी छावण्या आहेत; मात्र शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रथमच छावण्या सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. प्रत्येक शेळी-मेंढीमागे २५ रुपये दिले जाणार आहेत. चारा छावणी चालकांनी जनावरांच्या नोंदीची पूर्ण माहिती दिली नसेल तरी ८० टक्‍क्‍यांपर्यंत बिले तरी दिली जावीत, असा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना १११ कोटी, पुणे चार आणि नाशिक विभागीय आयुक्तांना ४७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

छावण्यांमधील जनावरांच्या सोयीसाठी शासनामार्फत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी; तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये उपस्थित असतात. अशावेळी महिलांसाठी त्या ठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृहे उभारावीत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. चारा छावण्यांची बिले जिल्हा प्रशासनाने तांत्रिक बाबी तपासून द्यावीत, त्यात विलंब करू नये, असे स्पष्ट करण्यात आले असून, ज्यांना शेतीच्या कामासाठी बैल दिवसभरासाठी न्यायचा आहे, त्यांना ते घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. राज्यात सध्या ६,२०९ टॅंकरच्या माध्यमातून ४,९२० गावे आणि दहा हजार ५०६ पाड्यांवर पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com