गोकुळच्या सर्वसाधारण सभेत आज काय होणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

गेले वर्षभर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गाजत असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. आता आजच्या सर्वसाधारण सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर - गेले वर्षभर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गाजत असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. आता आजच्या सर्वसाधारण सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यात झालेल्या बैठकीत मल्टिस्टेटचा निर्णय घेण्यात आला. गेले वर्षभर गोकुळ मल्टिस्टेट करण्यावरून जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले. या निर्णयामुळे उत्पादकासह संस्थांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा पुढे करत सुरवातीला आमदार सतेज पाटील यांनी या विरोधात आवाज उठवला. त्यानंतर या विरोधात जिल्ह्यातील सर्व महाडिक विरोधकांना त्यांनी एकत्र केले. महाडिक-सतेज वादाची किनार होती; पण त्यामुळे मल्टिस्टेट विरोधात वातावरण मात्र पेटले. संघाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत मल्टिस्टेटचा निर्णय रद्द केल्यानंतर आज, आज होणाऱ्या संघाच्या सर्वसाधारण सभेत तसा ठरावच करण्याचेही ठरले आहे.

मल्टीस्टेटच्या मुद्यावर गोकुळची गेल्या वर्षीची सभा गाजली. मोठ्या संख्येने विरोधकांनी त्याच दिवशी संघावर मोर्चा काढला. मुख्य प्रवेशद्वारावर विरोधकांना अडवल्याने संतप्त झालेल्या आमदार सतेज पाटील यांच्यासह चंद्रदीप नरके, हसन मुश्रीफ समर्थकांसह सभेत घुसले. त्यामुळे राडा झाला. चप्पल फेक, घोषणाबाजी यामुळे सभेतील वातावरण तणावपूर्ण बनले. अशा वातावरणातच बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करून घेण्यात आला. सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आमदार पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, संघाचे अध्यक्ष आपटे यांच्या उपस्थितीत ताराबाई पार्क कार्यालयाच्या बैठकीत दीर्घ चर्चेनंतर आणि खडाजंगीनंतर मल्टिस्टेट निर्णय मागे घेण्यात आला, असा ठराव उद्या (ता. 30) सभेत करण्याचे या वेळी ठरले.

महाडिकांना फटका
संघ मल्टिस्टेट करण्याचे पडसाद गेले वर्षभर जिल्ह्याच्या राजकारणात उमटत होते. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी याच मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांना विरोध केला किंबहुना त्यांच्या विरोधासाठी इतर भारी विरोधकांनाही त्यांनी एकत्र केले. त्याचा फटका श्री. महाडिक यांना लोकसभेत बसला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अमल महाडिक त्यापाठीमागे हेच कारण होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gokul co operative society general body meeting multistate proposal