"गोकुळ' चे दूध संकलन बंद; मुंबई, पुणेचे वितरणही अडचणीत  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

  • बिद्री शीतकरण केंद्र वगळता इतरत्र दूध संकलनच न करण्याचा निर्णय
  • सुमारे साडेसहा लाख लिटर दूध उत्पादकांच्या घरातच रहाणार
  • आठ दिवसांत दूध संकलन न झाल्याने उत्पादकांना सुमारे आठ कोटी रूपयांचा फटका 
  • मुंबई, पुण्याला जाणारे "गोकुळ' चे दूध थांबवले
  • मुंबईसाठी दूध भरून तयार असलेले 11 टॅंकर संघाच्या गोकुळ शिरगांव येथील कार्यालयातच. 

कोल्हापूर - गेल्या सहा दिवसांपासून पडत असलेला पाऊस आणि नद्यांना महापूर आल्याने बंद असलेले जिल्ह्यातील बहुंताशी मार्ग यामुळे बिद्री शीतकरण केंद्र वगळता इतरत्र दूध संकलनच न करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) घेतला आहे. यामुळे सुमारे साडेसहा लाख लिटर दूध उत्पादकांच्या घरातच रहाणार असून गेल्या आठ दिवसांत दूध संकलन न झाल्याने उत्पादकांना सुमारे आठ कोटी रूपयांचा फटका बसला आहे. 

दरम्यान, मुंबई, पुण्याला जाणारे "गोकुळ' चे दूध थांबवण्यात आले असून मुंबईसाठी दूध भरून तयार असलेले 11 टॅंकर संघाच्या गोकुळ शिरगांव येथील कार्यालयात थांबवून ठेवण्यात आले आहेत. मुंबईच्या दिशेने निघालेले चार टॅंकर वाटेतच थांबून आहेत तर गोकुळ शिरगांव येणारे दोन-तीन टॅंकर तवंदी घाट व कोगनोळी टोल नाक्‍यावर अडकून पडले आहेत. 

"गोकुळ' चे सकाळ व संध्याकाळचे मिळून दैनंदिन संकलन सुमारे साडे नऊ लाख लिटर आहे. यात गाईचे 48 टक्के तर म्हैशीचे 52 टक्के दुधाचा समावेश आहे. सर्वच नद्यांना महापूर आला असून पुराचे पाणी अनेक मार्गावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळी व संध्याकाळी दूध संकलनच न करण्याचा निर्णय "गोकुळ' ने घेतला आहे. पूरस्थितीची माहिती घेऊन उद्याच्या संकलनाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी सांगितले. 

आज बिद्री केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या गावांचे दूध संकलन करून त्याचठिकाणी त्यावर प्रक्रिया करण्यात येईल. परिसरातून किमान अडीच लाख लिटर दूध संकलित होईल, असा अंदाज आहे. तथापि उर्वरित सुमारे साडेसहा लाख लिटर दूध संकलनच होणार नाही. 

उद्याचा निर्णय पूरस्थिती पाहून - आपटे 
आज तरी दोन्ही वेळचे संकलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. बिद्री चिलिंग सेंटरमधून व रस्ते सुरू असलेल्या ठिकाणाहून दूध येईल तेवढेच संकलन होईल. मुंबई, पुण्याला दूध घेऊन जाणारे 11 टॅंकर थांबवण्यात आले आहेत. काही टॅंकर वाटेत अडकून आहेत. उद्या पूरस्थिती पाहून संकलनाचा निर्णय घेतला जाईल, असे संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी "सकाळ' ला सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gokul milk collection stopped Mumbai, Pune Distribution also in problem