अखेर गोकुळ अध्यक्षांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

कोल्हापूर - गेले वर्षभर सुरू असलेला गोकुळ अध्यक्ष बदलाचा विषय शुक्रवारी (ता. १४) नाट्यपूर्ण घडामोडीनंतर निकालात निघाला. सकाळी संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी गोकुळ संघात बैठक घेत, अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना राजीनामा देण्याची सूचना केली.

कोल्हापूर - गेले वर्षभर सुरू असलेला गोकुळ अध्यक्ष बदलाचा विषय शुक्रवारी (ता. १४) नाट्यपूर्ण घडामोडीनंतर निकालात निघाला. सकाळी संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी गोकुळ संघात बैठक घेत, अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना राजीनामा देण्याची सूचना केली. यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली. त्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी महाडिक यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. दै. ‘सकाळ’ने अध्यक्ष बदलाबाबत अचूक वार्तांकन करत शुक्रवारी अध्यक्ष बदल होणार असल्याचे वृत्त दिले होते. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आला.

अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
गोकुळचे अध्यक्ष होण्याची इच्छा प्रत्येक संचालकाला असली तरी सर्वांनाच ही संधी मिळत नाही. संचालकांचे नेत्यांशी असलेले संबंध, त्याची राजकीय पार्श्‍वभूमी, विरोधकांना टक्‍कर देण्याची ताकद, निवडणुकीला होणारी मदत आदी बाबींचा विचार करून अध्यक्षाची निवड केली जाते. या वेळी अध्यक्षपदासाठी संघाचे ज्येष्ठ संचालक रवींद्र आपटे, अरुण डोंगळे आणि रणजित पाटील यांच्यात चढाओढ आहे. यातच आता युवक संचालकांमधील ज्येष्ठ असणारे धैर्यशील देसाई यांच्या नावामुळे चुरस वाढली आहे. देसाई हे महाडिक यांचे कट्टर समर्थक आहेत. दरम्यान, अध्यक्ष निवडीसाठी कार्यक्रम प्राधिकरणाकडून लवकरच जाहीर होईल; मात्र त्यासाठीच्या राजकीय हालचालींना आता वेग आला आहे.

दरम्यान, ताराबाई पार्कात संघाच्या नेत्यांनी संचालकांची बैठक घेतली. त्यात अध्यक्ष पाटील यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. अवघ्या १५ मिनिटांत निर्णय देऊन दोन्ही नेते निघून गेले. दरम्यान, गोकुळ अध्यक्ष बदलण्यासाठी वर्षभर हालचाली सुरू होत्या. अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना साडेतीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी मिळाल्याने त्यांना बदलण्याची मागणी होत होती. यासाठी संचालकांनी संघाच्या नेत्यांना साकडेच घातले होते. मात्र या मागणीचा विचार न झाल्याने, संचालकांनी संघाच्या कामकाजात सहभाग न घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे संघात अध्यक्ष बदलासाठी हालचाल सुरू होती. संघातील वाद चव्हाट्यावर येऊ लागल्याने आज बैठक घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. महाडिक व पाटील सकाळी साडेदहाला गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आले. संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील आणि संचालक उपस्थित होते. महाडिक व पाटील यांनी बंद खोलीत चर्चा केली. यानंतर त्यांनी, विद्यमान अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना राजीनामा देण्यास सांगितले. 

नेत्यांनी दिला संचालकांना डोस
अध्यक्ष बदलासाठी दबाव टाकणाऱ्या, बंड करणाऱ्या संचालकांना संघाचे नेते महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी चांगलाच डोस दिल्याचे, संघाच्या आवारात बोलले जात होते. याची प्रचिती माध्यम प्रतिनिधींना शुक्रवारी दुपारी आली. गोकुळ दूध संघाच्या घडामोडी सांगणाऱ्या अनेक संचालकांना अध्यक्ष बदलाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी वारंवार संपर्क साधला; मात्र एकाही संचालकाने फोन घेण्याचे धाडस दाखवले नाही.
 

Web Title: Gokul president resign