कोल्हापूरः ७१ लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

कोल्हापूर - सरनोबतवाडी येथील तपासणी नाक्‍यावरील पथकाने आज सकाळी एका खासगी कंपनीच्या मोटारीतून ७१ लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने जप्त केले. ते राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. प्राप्तिकर विभाग याबाबतची चौकशी सुरू केली आहे. 

कोल्हापूर - सरनोबतवाडी येथील तपासणी नाक्‍यावरील पथकाने आज सकाळी एका खासगी कंपनीच्या मोटारीतून ७१ लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने जप्त केले. ते राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. प्राप्तिकर विभाग याबाबतची चौकशी सुरू केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात एसएसटी (स्थिर सर्वेक्षण पथक) पथके तैनात केली आहे. या पथकांकडून शहरात अगर सीमा भागाला जोडणाऱ्या मार्गावर वाहनांची तपसाणी केली जाते. पैसे, दारू, सोन्याच्या तस्करीबरोबर गुन्हेगारांवर या पथकाकडून नजर ठेवली जाते. सरनोबतवाडी येथेही हे पथक तैनात आहे. आज या पथकात शाखा अभियंते जी. एस. तवटे, बी. एस. कांबळे, पोलिस कर्मचारी संदीप कांबळे, युनूस जमादार हे कर्तव्य बजावत होते. मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी या पथकाकडून केली जात होती.

दरम्यान, एक निळ्या रंगाची मोटार महामार्गावरून सरनोबतवाडी मार्गे शहरात येत होती. ती मोटार पथकाने थांबवली. तपासणीत गाडीत पथकाला मोठ्या प्रमाणावर हिरेजडीत सोन्याचे दागिने असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या दागिन्याबाबत चौकशी केली. मात्र संबंधितांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी ही मोटार थेट राजारामपुरी पोलिसात आणून ती दागिन्यांसह पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांसह प्राप्तिकर विभागाला दिली. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तातडीने राजारामपुरी पोलिसात दाखल झाले. 

प्राथमिक चौकशीत हिरेजडीत सोन्याचे दागिने पुण्याहून कोल्हापूरला आणले जात होते. ते दिलेल्या ऑर्डरप्रमाणे व्यापाऱ्यांना दिले जाणार होते. त्यांची अंदाजे किंमत ७१ लाखांच्या घरात आहे. दागिन्यांच्या वाहतुकीचे काम एका खासगी कंपनीमार्फत महाराष्ट्रासह केरळपर्यंत केले जाते, अशी माहिती पुढे आली. याबाबत दागिन्यांचे संबंधित मालकांकडे प्राप्तिकर विभागाने चौकशी करून त्यांच्याकडील कागदपत्राची तपासणी करण्याचे काम सुरू केले. ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू होती. चौकशी अंती ही मालमत्ता हिशेबी की बिनहिशेबी हे स्पष्ट होणार असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. 

सरनोबतवाडी मार्गाचा अवलंब का?
पुण्यावरून किमती सोन्याचे दागिन्याची वाहतूक करताना मुख्य मार्ग असतानाही सरनोबतवाडीचा अवलंब का केला गेला? याच कारणावरून पोलिसांचा संशय बळावला. याची माहिती पोलिसांकडून घेतली आहे. 

दोन कोटींचा मुद्देमाल जप्त 
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंर जिल्ह्यात ४८ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली. पथकाकडून या नाक्‍यावर २४ तास लक्ष्य ठेवले जाते. पथकाने केलेल्या वाहन तपासणीतून आतापर्यंत सुमारे एक कोटीची रोकडसह २१ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 

सरनोबतवाडी तपासणी नाक्‍यावर मोटारीतून ७१ लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. याची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. यानंतर निवडणूक आयोगाच्या समितीकडूनही चौकशी करून त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल. 
- संजय मोरे,
पोलिस निरीक्षक

Web Title: Gold jewelery seized by 71 lakh diamonds