कॉन्स्टेबल शेखर असोदे यांना सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित : उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार

निपाणी : येथील मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयातील कॉन्स्टेबल शेखर असोदे यांनी २०१७ साली सेवा बजावत असताना भर दुपारी दरोडा घालणाऱ्या आंतरराज्य दरोडेखोरांशी झटापट करून जेरबंद केले होते. त्यांची ही कामगिरी पाहून राज्य पोलिस दलाने मुख्यमंत्री सुवर्ण पदक घोषित केले होते. शुक्रवारी (ता. २०) सकाळी त्यांना बंगळूर येथील समारंभात मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या पुरस्कारामुळे त्यांचे निपाणी परिसरात कौतूक होत आहे.

येथील रामनगरात २०१७ साली वास्तव्यास असलेले हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक आपल्या कुटुंबीयांसमवेत गावी गेले होते. त्यावेळी दुपारच्या सत्रात बंद घराचे कुलूप तोडून बीड आणि परळी येथील ५ आरोपी दरोडा टाकत होते. त्याची माहिती पोलिसमित्र संजय सूर्यवंशी व बाळासाहेब तराळ यांनी कॉन्स्टेबल शेखर असोदे यांना दिली. यावेळी असोदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाच दरोड़ेखोर घरात घुसून तिजोरी व इतर कपाटातून सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कमेसह साहित्य घेऊन पोबारा करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी असोदे यांनी जिवाची पर्वा न करता थेट दरोडेखोरांशी झटापट केली.

हेही वाचा- सावधान : आता चोरट्यांचा बॅटऱ्यांवर डल्ला -

दरोडेखोरांनी आपल्याजवळील पिस्तूल व हत्याराद्वारे असोदे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही न डगमगता त्यांनी टोळीतील चार दरोडेखोरांना जेरबंद केले होते. तर एक आरोपी फरार झाला होता. काही कालावधीनंतर त्या आरोपीलाही पोलिसांनी पकडले होते. असोदे यांनी धाडस दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुखांनी निपाणीतील घटनास्थळी भेट देऊन असोदे यांचे कौतूक केले होते.

या शिवाय असोदे यांचा निपाणी मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षात चोरी व इतर अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात महत्वाचा वाटा आहे. ते कर्तव्यदक्ष कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. या सर्व बाबींची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बंगळूर येथील कार्यक्रम प्रसंगी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण सुद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold medal to Constable Shekhar Asode nipani