सोनेरी टोळीने व्यापाऱ्यांची दिशाभूल करणे थांबवावे : आमदार गाडगीळ

Golden gang should stop misleading traders : MLA Gadgil
Golden gang should stop misleading traders : MLA Gadgil

सांगली ः आयर्विन पुलाला नियोजित समांतर पुलामुळे सांगलीची बाजारपेठेत संपेल, अशा भूलथापा महापालिकेतील सोनेरी टोळीकडून सुरू असून व्यापाऱ्यांनी त्याला बळी पडू नये, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज केले. काल व्यापारी संघटनेचे नेते समीर शहा यांच्यासह व्यापाऱ्यांनी पूलप्रकरणी बैठक घेतली होती. या बैठकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार गाडगीळ यांना लक्ष्य केले होते. त्यावर आमदारांनी आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पलटवार केला. 


ते म्हणाले,""व्यापाऱ्यांना भीती घालून सांगलीच्या विकासालाच स्थगिती देण्याचा उद्योग काही मंडळी करीत आहेत. खरे तर हा पर्यायी पूल आधीच व्हायला हवा होता. पण आधीच्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. आमदार म्हणून नव्हे तर पिढीजात व्यापारी म्हणून सांगलीच्या बाजार पेठेचा विकास, सांगलीतील वाढलेली वाहतूक या गोष्टी लक्षात घेऊन मी हा व हरिपूर-कोथळीचा पूल मंजूर करून आणला. हरिपूरचा पूल पूर्णत्वास आला आहे.

मात्र सांगलीचा पूल काहींच्या राजकारणामुळे झाला नाही. आयर्विन पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवल्यानंतर माझ्या मागणीचे गांभीर्य लक्षात आले. आज मेनरोड, हरभट रोड, सराफ कट्टा, गणपती पेठेतील ग्राहक घटला आहे. हे लक्षात आल्यावर तेथील व्यापाऱ्यांचा विरोध मावळला आहे. नवीन पुलावरून येणारी मोठी वाहने ही गणपती पेठ मार्गे किंवा हरभट रोड वरून जातील.

त्यामुळे मेनरोड वर वाहतुकीचा ताण येणार नाही. जवळपास पूर्ण मेन रोड हा 60 फूटच आहेच. काही भागच न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने तो भाग अजून रुंद झाला नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय होईल. त्याचा नव्या पुलाशी काहीही संबंध नाही.'' 

लोकेच्छा विचारात घेऊन योग्य ठिकाणीच पूल
पुलाबाबत आमदारांनी विश्‍वासात घेतले नाही, ही सर्व व्यापाऱ्यांची भावना आहे. ती रास्तच आहे. पांजरपोळ ते मेन रोडपर्यंतच्या किती मालमत्ता बाधित होतील हे आम्ही पुराव्यांसह मांडू. थापा कोण मारतेय हे आता स्पष्ट झाले आहे. व्यापाऱ्यांचा आणि सांगलीवाडीकरांचा पुलाला नव्हे, तर पुलाच्या जागेला विरोध आहे. शहरहित आणि लोकेच्छा विचारात घेऊन योग्य ठिकाणीच पूल होईल. 
- दिग्विजय सूर्यवंशी, महापौर 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com