महिलांकडे बघताना ममता आठवायला हवी - डॉ. सिंधूताई सपकाळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

गोंदवले - महिलांकडे बघताना ममता आठवली तरच निरोगी समाज घडेल, असे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त समाजसेविका डॉ. सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.

गोंदवले - महिलांकडे बघताना ममता आठवली तरच निरोगी समाज घडेल, असे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त समाजसेविका डॉ. सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.

दहिवडी (ता. माण) येथील दहिवडी कॉलेजमध्ये महिला दिनानिमित्त माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून माणदेश फाउंडेशन पुणे, ड्रीम फाउंडेशन पुणे व रयत शैक्षणिक संकुल यांच्या वतीने आयोजित केलेल्या माण तालुक्‍यातील कर्तृत्ववान व गुणवंत महिलांच्या सत्कार समारंभात डॉ. सपकाळ बोलत होत्या. त्यावेळी प्रभाकर देशमुख, माणदेशी महिला बॅंकेच्या संस्थापिका अध्यक्षा चेतना सिन्हा, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर-भोसले, मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, ड्रीम फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा देशमुख, तहसीलदार सुरेखा माने, जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ, सोनाली पोळ, दहिवडीच्या नगराध्यक्षा साधना गुंडगे, म्हसवडच्या उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, कविता म्हेत्रे, योगिनी नरळे, सपना वाघमोडे, रेखा जाधव, इंद्रायणी जवळ, रेखा पवार, सुप्रिया भागवत, मनीषा जवळ, कामिनी शीलवंत आदी मान्यवर उपस्थित होते.    

चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘‘प्रभाकर आणि अनुराधा देशमुख हे गोल्डन दांपत्य असल्याने माणच्या विकासाला मोठी मदत होत आहे. या दांपत्याच्या कामाला सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे.’’ ललिता बाबर म्हणाल्या, ‘‘मुलींना केवळ चूल आणि मूल यामध्ये अडकून न ठेवता त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.’’

यावेळी चेतना सिन्हा, ललिता बाबर-भोसले यांना डॉ. सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पार्वतीबाई 
पोळ, गुणाबाई जानकर व कृष्णावाई जवळ यांचा प्रेरक माता म्हणून सन्मान करण्यात आला. संगीता धायगुडे यांना राष्ट्रमाता जिजाऊ, समाजसेविका रमाबाई तोरणे यांना राजमाता अहल्याबाई होळकर पुरस्काराने तर प्राथमिक शिक्षिका सुजाता कुंभार यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवछत्रपती पुरस्कार विजेती नेमबाज रुचिरा लावंड तसेच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या आईसह इतरांचा सत्कार करण्यात आला. ‘महिलांसाठी कायदेशीर तरतुदी’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, तानाजी कट्टे, डॉ. संदीप पोळ, डॉ. माधवराव पोळ, प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत यांच्यासह महिला उपस्थित होत्या. अनुराधा देशमुख यांनी प्रास्ताविक केले. इंद्रायणी जवळ-मस्के व हणमंतराव जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: gondawale news women sindhutai sapkal