कप-बशीला पुन्हा चांगले दिवस

अलताफ शेख
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

बदलत्या काळात गायब झालेले चहाचे कप आता पुन्हा एकदा टपऱ्यांवर दिसू लागले आहेत. 
चहा पिण्यासाठी पूर्वी कप-बशीचा वापर होत होता. घरोघरी, तसेच बाहेर सर्व हॉटेले, हातगाड्या, टपऱ्यांवर चहासाठी कप-बशीचाच वापर होत होता. चहा आणि कप-बशी हे समीकरणच तयार झाले होते

अकोले : बदलत्या काळात गायब झालेले चहाचे कप आता पुन्हा एकदा टपऱ्यांवर दिसू लागले आहेत. 
चहा पिण्यासाठी पूर्वी कप-बशीचा वापर होत होता. घरोघरी, तसेच बाहेर सर्व हॉटेले, हातगाड्या, टपऱ्यांवर चहासाठी कप-बशीचाच वापर होत होता. चहा आणि कप-बशी हे समीकरणच तयार झाले होते.

गेल्या काही वर्षांत काळाबरोबर अनेक बदल होत गेले. तसे हॉटेलमधून कप गायब होऊन काचेच्या ग्लासमधून चहा दिला जाऊ लागला. त्याचा आकारही नंतर छोटा-छोटा होत गेला. त्यानंतर त्यातही बदल होऊन काचेच्या ग्लासची जागा प्लॅस्टिकच्या ग्लासने घेतली. त्यांचा सर्रास वापर होऊ लागला. 

प्लॅस्टिकमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन सरकारने त्यावर बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा बदल होऊन प्लॅस्टिकऐवजी कागदी ग्लास बाजारात आले. त्यातून चहा दिला जाऊ लागला. या सगळ्या बदलत्या चक्रात कप-बशी नामशेष झाल्यासारखीच परिस्थिती होती. बदलत्या काळात व्यवसायातील स्पर्धा वाढली, तसे प्रत्येक जण स्पर्धेत टिकण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना बाजारात आणू लागला. 

टपऱ्यांवरून गायब झालेल्या कप-बशीला पुन्हा एकदा "अच्छे दिन' आले. सध्या बहुतांश हॉटेले, कॅफेसह हातगाड्या, टपऱ्यांवर पुन्हा एकदा चहासाठी कप वापरले जात आहेत. नामशेष समजल्या जाणाऱ्या कप-बशीला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. 

"जुने तेच सोने' 

प्लॅस्टिक व कागदी कपापेक्षा जुनेच मातीचे कप अधिक उपयुक्त आहेत. मध्यंतरीच्या काळात हे कप ग्राहकांना आवडत नव्हते. काही जण या कपाने चहा पिणे कमीपणाचे मानत. मात्र, आता "जुने तेच सोने' म्हणण्याची वेळ आली आहे. कारण पुन्हा ग्राहक मातीच्या कपांना पसंती देऊ लागले आहेत. एक काळ असा होता की, विविध आकर्षक कप (क्रॉकरी) श्रीमंतांच्या घराची शोभा वाढवित होते. कपात चहा पिण्याची मजा काही औरच. हे कप काळजीपूर्वक स्वच्छ करता येतात. त्यामुळे कोणताही अपाय होण्याची भीती राहत नाही. 

- अजय यादव, चहाविक्रेते, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good day again to the cup