कुख्यात गुंडाला पकडताना प्रतापपुरात पोलिसांवर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

प्रतापपुरच्या उरसाला गुंड जाधव याने मोठी मदत दिली आहे. गावात सर्वत्र त्याचे डिजिटल पोस्टर्स झळकले होते. तमाशाचा उद्‌घाटनाला तो येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचला होता. झटापट व दगडफेकीमुळे तो पोलिसांच्या हातातून निसटला. 

जत : मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला गुंड दत्तात्रय जाधव याला अटक करण्यासाठी प्रतापपूर येथे आलेल्या पोलिसांवर काल मध्यरात्री दगडफेक करण्यात आली. गावातील उरसात तमाशा सुरु असताना तेथे पोलिसांनी छापा टाकल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. जाधव टोळीतील गुंडासह महिलांनी दगडफेक केली, महिला पोलिसांना गळा आवळून मारण्याचा प्रयत्न झाला. 

गोंधळाचा फायदा घेऊन जाधव पळाला. मात्र, त्याच्या भावासह सहा जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा पोलिसांनी जत पोलिसांच्या सहकार्याने मोहिम राबवली. याबाबतची पोलिसांनी सांगितले, की सातारा येथील प्रतापसिंहनगर परिसरात झोपडपट्टीदादांच्या टोळीने सातारा जिल्ह्यात दहशत माजविली आहे. या टोळीवर पंधराहून अधिक गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्‍या दत्तात्रय रामचंद्र जाधव आणि त्याच्या साथीदारावर मोका लावण्यात आला आहे. जाधव फरारी आहेत. तो साथीदारासह प्रतापपूर येथे पीरबाबाच्या उरसाला येणार असल्याची खबर सातारा पोलिसांना मिळाली होती. 

कुसेगाव पोलिस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी अधीक्षक पवन बनसोडे व त्याच्या पथकातील कर्मचारी त्याला अटक करण्यासाठी आले. मदतीसाठी जतचे उपविभागीय अधिकारी नागनाथ वाकुडे व त्याचे कर्मचारी गेले. त्यावेळी तमाशा सुरु होता. पोलिसांनी जाधवला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिस आल्याचे समजताच पळून जाऊ लागला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी धाव घेताच त्याचा भाऊ युवराज जाधव, भेजा जाधव यांच्यासह पंधरा ते वीस साथीदार आडवे आले. त्यांची पोलिसांशी झटापट झाली. 

युवराजने व्यासपीठावर जाऊन माईकचा ताबा घेतला. "पोलिस आलेत त्यांना मारा, सोडू नका'' असा आवाज दिला. त्यामुळेच एकच गोंधळ उडाला. काही तमाशा शौकीन पळाले. काही महिलांनी पोलिसांवर हल्ला केला. महिला पोलिस महिलांना ताब्यात घ्यायला पुढे गेल्या. त्यावेळी युवराज जाधव आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलिसांचा गळा आवळून मारण्याचा प्रयन्त केला. 

प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी लाठीमार सुरु केला. गर्दी पांगली. गोंधळाचा फायदा घेऊन गुंड जाधव पळून गेला. मात्र, पोलिसांनी युवराज व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांना गाडीत घालून घेऊन जात असताना महिलांनी दगडफेक केली. 

अधीक्षक बनसोडे यांची गाडी (क्र. एम एच 12 पी डी 6998), जत उपाधीक्षकांची गाडी (क्र. एम एच 10 एन 695), जत पोलिसांची गाडी (क्र. एम एच 10 एन 2526) या गाड्याच्या काचा फोडण्यात आल्या. महिला पोलिस कर्मचारी वहिदा मुजावर, पी. बी. खाडे, सपना निकम, जे. एम. राणे, ए. ए. शिंदे (सर्व जत) व वैभव सावंत (सातारा) हे जखमी झाले. 
याप्रकरणी पोलिसांनी 20 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. खली उर्फ कृष्णा बेडेकर, अमर भांडे, शिवाजी पवार, अमोल मुणेकर, सोमनाथ मोटे (सर्व रा. प्रतापसिंहनगर झोपडपट्टी, सातारा) या सहा जणांना अटक केली आहे.

Web Title: Goons Attack on Police Pratappur Police