खानापूरमधील क्रांतिस्मृतीवन विकासाला पाच कोटी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

"क्रांतिस्मृतीवन उभारण्यामागची उदात्त भावना लक्षात घेऊनच या परिसराचा विकास होईल. राष्ट्रीय विचाराचे हे प्रेरणास्थळ ठरावे असेच उपक्रम राबवले जातील. त्याबरोबरच समाजाची वाटचाल वैज्ञानिक व विवेकवादी विचारांच्या दिशेने व्हावी यासाठी शाळकरी मुलांसाठी विविध प्रकल्पांची उभारणी केली जाईल."

सांगली - खानापूर तालुक्‍यातील बलवडी (भा) येथील क्रांतिस्मृतीवनला राज्य शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. पाच कोटींचा विकासनिधी मंजूर केल्याची माहिती उगम फाऊंडेशनचे कार्यवाह अॅड. संदेश पवार यांनी आज दिली.

नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती व्हावी. देशप्रेमाची भावना सतत तेवत ठेवावी याच हेतूने यापुढेही निधीचा विनियोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

समाजसेवक मुकंदराव किर्लोस्कर, प्रा. ग. प्र. प्रधान, राम बापट, चंद्रशेखर धर्माधिकारी, मेधा पाटकर, जयंतराव टिळक, मोहन धारिया, वसंत बापट, बाबा आढाव, निळू फुले, उषा मेहता यांच्या विचारातून 18 जानेवारी 1992 रोजी क्रांतिस्मृतीवनची स्थापना झाली. येरळाकाठी वसवलेल्या स्मृतीवनात देशभरातील क्रांतिकारकांच्या स्मृतीनिमित्त एकेक वृक्ष लावण्यात आला. वृक्षांच्या रूपातील हे स्मारक राज्यभरातील स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या वैचारिक चळवळीचे केंद्र ठरलेय. शासनाने आता या क्रांतिस्मृतीवनला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला. 

अॅड. पवार म्हणाले,""क्रांतिस्मृतीवन उभारण्यामागची उदात्त भावना लक्षात घेऊनच या परिसराचा विकास होईल. राष्ट्रीय विचाराचे हे प्रेरणास्थळ ठरावे असेच उपक्रम राबवले जातील. त्याबरोबरच समाजाची वाटचाल वैज्ञानिक व विवेकवादी विचारांच्या दिशेने व्हावी यासाठी शाळकरी मुलांसाठी विविध प्रकल्पांची उभारणी केली जाईल. साडेतीन कोटी रुपयांचे विज्ञान केंद्र उभे करण्याचा मानस आहे. हे स्मृतीवन उभे रहावे यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांनी उगम फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वतःची साडेचार एकर जमीन दिली आहे. तेथे यापूर्वी लोकवर्गणीतून यापूर्वीच विविध कामे झालीत. आता शासन निधीतून कुंपण, अंतर्गत रस्ते, पार्किंग सुविधा, दिवाबत्ती, अंतर्गत विद्युतीकरण, सौर ऊर्जा यंत्रणा, पर्यटन निवास अशी कामे होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार अनिल बाबर, मोहनराव कदम यांनी विशेष सहकार्य दिले. वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी विकास आराखडा बनवला आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government give 5 cores to develoment of Khanapur Krantismrutivan