शासकीय आरोग्य सेवा आजारी 

तात्या लांडगे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

सोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्‍निशियनची सुमारे 45 टक्‍के पदे रिक्‍त आहेत. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असून, आपत्कालीन परिस्थितीत अत्यल्प असलेल्या डॉक्‍टरांवर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. 

तालुका पातळीवरील ग्रामीण रुग्णालयांमध्येही मागील दीड वर्षापासून डॉक्‍टर, परिचारिका आणि सफाईदारांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्‍त आहेत. त्याबाबतची माहिती शासनाकडे पाठवूनही अद्यापही ती पदे भरलेली नाहीत. राज्यभरातील शासकीय ग्रामीण व शहरी रुग्णालयांमध्ये अशीच स्थिती असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आरोग्य व शिक्षणाला प्राधान्य देण्याच्या गोष्टी करणाऱ्या सरकारकडून सर्वसामान्यांच्या रुग्णसेवेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. मनुष्यबळाअभावी रुग्णांना सोयी-सुविधा मिळत नाहीत, उपचारासाठी तासन्‌तास थांबावे लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे, तर दुसरीकडे रोजंदारी कर्मचाऱ्यांना मागील सहा-सात महिन्यांपासून मानधनही मिळालेले नाही. त्यामुळे शासकीय रुग्णसेवाच आजारी असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. 

संवर्गनिहाय रिक्‍तपदे 
परिचारिका  -150 
डॉक्‍टर - 17 
सफाईदार व कक्षसेवक  - 137 
लॅबोरेटरी (टेक्‍निशियन)  - 20 
लिपिक  -20 

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) डॉक्‍टरांसह परिचारिका, सफाईदार, लिप्पिक अशी विविध पदे रिक्‍त आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचीही परिस्थिती अशीच आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही त्या अद्यापपर्यंत भरण्यात आल्या नाहीत. 
- डॉ. सुनील घाटे, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय 

Web Title: Government Health Services issue in solapur