समीर गायकवाडचा विनंती अर्ज फेटाळला

समीर गायकवाडचा विनंती अर्ज फेटाळला

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाडने जामिनाबाबत घालून दिलेल्या अटी, शर्ती शिथिल करा, याबाबत न्यायालयात दाखल केलेला विनंती अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जिल्हा न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्याकडे सुनावणी झाली. 

पानसरे हत्या प्रकरणातील पहिला संशयित गायकवाडला जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार त्याला प्रत्येक रविवारी कोल्हापुरातील एसआयटीमध्ये हजेरी देणे, राज्याबाहेर न जाणे, पासपोर्ट जमा करणे आदी अटी व शर्ती आहेत. त्या शिथिल कराव्यात, असा अर्ज त्याने न्यायालयात केला होता. 

सुनावणीवेळी समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी सांगितले, की समीरला जामीन मंजूर झाल्यापासून तो नियमित रविवारी हजेरी देतो. आतापर्यंत त्याने घालून दिलेल्या एकाही अटीचा व शर्तीचा भंग केलेला नाही. त्याची पत्नी गर्भवती आहे. तिला भेटण्यासाठी त्याला कर्नाटकातील संकेश्‍वर येथे जायचे आहे. त्यासाठी अटी व शर्ती शिथिल करून त्याला कर्नाटकात जाण्याची परवानगी मिळावी.

यावर विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे म्हणाले, ‘‘सरकार पक्षातर्फे पानसरे हत्येसंदर्भातील आरोपपत्र दाखल केले असले, तरी पुढील तपास अद्याप सुरू आहे. तो उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे. समीरच्या जामीन अर्जावर तपास यंत्रणेने उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केलेली आहे. सध्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ नेते पानसरे आणि गौरी लंकेश हत्येचा तपास महाराष्ट्र, कर्नाटक एसआयटी आणि पुणे सीबीआयमार्फत सुरू आहे. त्यांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरेही लागले आहेत. तपास अंतिम टप्प्यात आहे. त्यात संशयितांचीही गरज लागू शकते. समीर कर्नाटकात जाणार असल्याने त्याच्याकडून साक्षीदारांवर दबाबही आणला जाऊ शकतो.’’ दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश शेळके यांनी समीरचा अर्ज फेटाळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com