गोळीबारानंतर सर्व आरोपी जमले टेंबलाई टेकडीवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील गोळीबारानंतर हल्लेखोर टेंबलाई टेकडीवर एकत्र जमले. येथूनच भरत कुरणेने पिस्तूल बेळगावला गडहिंग्लजमार्गे नेल्याची माहिती न्यायालयातील सुनावणीवेळी समोर आली. दरम्यान, या हल्ल्यात वापरलेली मोटारसायकल संशयितांनी तावडे हॉटेलजवळ लावली होती, असेही संदर्भ पुढे आले. या साऱ्या बाबी विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी युक्तिवादादरम्यान स्पष्ट केल्या.

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील गोळीबारानंतर हल्लेखोर टेंबलाई टेकडीवर एकत्र जमले. येथूनच भरत कुरणेने पिस्तूल बेळगावला गडहिंग्लजमार्गे नेल्याची माहिती न्यायालयातील सुनावणीवेळी समोर आली. दरम्यान, या हल्ल्यात वापरलेली मोटारसायकल संशयितांनी तावडे हॉटेलजवळ लावली होती, असेही संदर्भ पुढे आले. या साऱ्या बाबी विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी युक्तिवादादरम्यान स्पष्ट केल्या.

दरम्यान, या प्रकरणी अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी व भरत कुरणे यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. पिस्तूल तसेच दुचाकीबाबत पुढील तपासासाठी व फरारी विनय पवार, सारंग अकोळकर यांच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी आणखी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी केली. न्यायाधीश एस. एस. राऊळ यांनी

दोघांच्या कोठडीत १५ डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. 
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने एक डिसेंबरला नालासोपारा बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित वासुदेव सूर्यवंशी व गौरी लंकेश हत्याप्रकरणातील भरत कुरणेला ताब्यात घेतले आहे. दोघांच्या कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे दोघांना जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले.

न्यायाधीश एस. एस. राऊळ यांच्यासमोर सुनावणी झाली. युक्तिवादादरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी तपासातील बाबी न्यायालयासमोर मांडल्या. त्यांनी मुद्दा मांडला, की फेब्रुवारी २०१५ ला वीरेंद्र तावडेने बेळगाव जिल्ह्यात आयोजित केलेल्या बॉम्बस्फोट प्रशिक्षणासाठी वासुदेव सूर्यवंशी व भरत कुरणे यांच्यासह सात ते आठजण उपस्थित होते. त्याच दिवशी पानसरे हत्येसाठी बैठक झाली. या बैठकीलाही सर्व उपस्थित होते. या दोघांशिवाय उपस्थित असणारे अन्य कोण, त्यात फरारी विनय पवार, सारंग अकोळकर होते का, याचा शोध घ्यायचा आहे.

ते म्हणाले, की त्याचबरोबर हत्येसाठी मोटारसायकल आणण्याची जबाबदारी सूर्यवंशीची होती. बेळगावहून आणलेली मोटारसायकल तावडे हॉटेल परिसरात लावली होती. ते ठिकाण त्याने पोलिसांना दाखवले आहे. त्या मोटारसायकलीचे पुढे काय झाले, याचा तपास करावा लागणार आहे.

याशिवाय हल्ल्यानंतर वीरेंद्र तावडे, अमोल काळे व भरत कुरणे व त्याचा अन्य एक साथीदार टेंबलाई मंदिर परिसरात जमले होते. यावेळी वीरेंद्र तावडेने गुन्ह्यातील पिस्तूल भरत कुरणेकडे दिले. त्याने ते साथीदारासह गडहिंग्लजमार्गे बेळगावला नेल्याचे तपासात उघड होत आहे. या दरम्यान एका गावातील पोलिस पाटीलांना कुरणेचा संशय आल्याने त्यांनी त्याची चौकशी केली; मात्र स्थानिक ओळख सांगितल्यानंतर त्यांना सोडले होते. हे पिस्तूल कुरणे याने कोठे लपवले आहे, याचाही शोध घेण्यासाठी दोघांना सात दिवसांची कोठडी द्यावी असा युक्तिवाद ॲड. राणे यांनी केला. 

संशयितातर्फे युक्तिवाद करताना ॲड. समीर पटवर्धन यांनी एसआयटीच्या दृष्टीने मुख्य संशयित असलेला अमोल काळे १४ दिवस त्यांच्या ताब्यात होता. त्यावेळी या घडामोडी का समोर आल्या नाहीत, असा सवाल केला. तपास यंत्रणा वेळकाढूपणा करत असून हा सर्व खर्च सामान्य लोक भरत असलेल्या करातून होत आहे. या पैशाचा अपव्यय होत आहे. तपास यंत्रणेतील विरोधाभास यापूर्वीही समोर आल्याने दोघांना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती समीर पटवर्धन यांनी न्यायालयासमोर केली.

Web Title: Govind Pansare Murder case follow up