अमित देगवेकरला नऊ दिवसांची पोलीस कोठडी 

अमित देगवेकरला नऊ दिवसांची पोलीस कोठडी 

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमित रवींद्र देगवेकर (वय 38, कळणे, सिंधुदुर्ग) या आणखी एका संशयितास महाराष्ट्र एसआयटीने अटक केली. सोमवारी रात्री उशिरा बंगळूर न्यायालयातून त्याचा ताबा घेण्यात आला. आज जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांनी त्याला बुधवार (ता.23 ) पर्यत पोलीस कोठडी सुनावली. पानसरे हत्येप्रकरणी अटकेची कारवाई झालेला हा आठवा संशयित आहे. 

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकाराने बंगळूर एसआयटी अमित देगवेकरला अटक केली आहे. या तपासा दरम्यान देगवेकरचा अंधश्रद्धा निर्मुलनचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येत सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने देगवेकरचा ताबा घेऊन चौकशी केली होती. यानंतर त्याची पुन्हा बंगळूर कारागृहात रवानगी केली होती. पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीने सोमवारी रात्री बेंगलोर न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून देगवेकरचा ताबा घेतला.

आज सकाळी त्याच्यावर अटकेची कारवाई करून जिल्हा सत्र न्यायालयात समोर हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांच्या समोर सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी युक्तिवाद करताना देगवेकर हा सनातन संस्थेसाठी पूर्ण वेळ काम करत होता. तसेच या गुन्ह्यातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे व फरारी सारंग आकोळकर यांच्या तो नेहमी संपर्कात होता. तावडे व देगवेकर हे दोघे अनेक कार्यक्रमात सोबत असायचे. शस्त्र व बॉम्ब तयार करण्याच्या प्रशिक्षणावेळीही देगवेकर उपस्थित होता.

त्यामुळे या हत्येच्या कटात त्याचा सहभाग होता हे स्पष्ट असल्याचे न्यायालया समोर सांगितले. पुढील सखोल तपासासाठी 14 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद ही राणे यांनी केला. संशयिताच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड.समीर पटवर्धन यांनी बंगळूर एसआयटीचा तपास सीबीआयकडून व सीबीआयचा तपास कोल्हापूर एसआयटी कडून ""कॉपी पेस्ट'' केला जात आहे. मागील संशियीतांच्या पोलीस कोठडीसाठी जी कारणे दिली तीच कारणे यावेळी दिली जात आहेत. यातून काहीच हाती लागणार नाही असा युक्तिवाद करत पोलीस कोठडी देऊ नये अशी विनंती केली. पोलीस कोठडी दिलीच तर 3 दिवसांची द्यावी. त्यानंतर तपास अहवाल मागवून पुढील निर्णय घ्यावा अशी विनंती पटवर्धन यांनी न्यायालयासमोर केली. 

दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर प्रथमवर्ग न्यायाधीश जी. जी. सोनी यांनी डेगवेकरला 23 जानेवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली. 

नऊ दिवस पोलीस कोठडी सुनावल्यानंतर संशयित देगवेकर याला रोज भेटण्याची परवानगी द्यावी अशी विनंती अॅड.समीर पटवर्धन यांनी न्यायालयाला केली. यावर न्यायालयाने संशयित कोल्हापूरमध्ये असेल, त्यावेळी दररोज सायंकाळी 5 ते 6 या वेळेत भेटण्याची परवानगी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com