‘जीपीएस’मध्ये फसवणाऱ्यांना आता चाप!

GPS
GPS

कऱ्हाड - पाणीटंचाईच्या काळात टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही शासनाकडून केली जाते. त्यात होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी संबंधित टॅंकरना जीपीएस प्रणाली बसवणे बंधनकारक केले. मात्र, या प्रणालीतही फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी, ही कार्यवाही पारदर्शकपणे होण्यासाठी आता प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी सुरू असलेल्या टॅंकरची प्रणाली तपासणीचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांनी अहवाल दिल्यानंतरच आता संबंधित टॅंकरची बिले काढण्यात येणार आहेत. 

गेल्या काही वर्षांत भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाकडून टंचाई असलेल्या गावांतील लोकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही केली जाते. ती करत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरचा ठेका देण्यात येतो. कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर टॅंकर सुरू होतात. मात्र, त्या टॅंकरच्या सेवेमध्ये अनियमितता येऊन त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्याही काही घटना समोर आल्या. त्याची दखल घेऊन शासनाने टॅंकरव्दारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पाणी पोचले की नाही, याची तपासणी करण्यासाठी टॅंकरलाच जीपीएस प्रणाली बसवण्याची कार्यवाही सुरू केली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात संबंधित यंत्रणेमुळे दबाव येऊन पाणीपुरवठ्याची चांगली सोय झाली. मात्र, गेल्या दोन वर्षात संबंधित प्रणालीचा योग्य वापर होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने आता संबंधित यंत्रणेवर ‘वॉच’ ठेवण्याचे अधिकार प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जे टॅंकर सुरू आहेत, त्याच्या प्रणालीची आणि जेथे तो जाणार आहे, तेथील सातत्याने पडताळणी केली जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्याकडून दर आठवड्याला टंचाई कक्षाला त्यासंदर्भातील अहवाल दिला जाणार आहे. त्यानंतरच संबंधित टॅंकरची बिले काढण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईच्या काळात जीपीएस यंत्रणेलाही थुका लावणाऱ्यांना चाप बसणार आहे.

...अशी होईल तपासणी 
शासनाकडून टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही सुरू झाल्यानंतर संबंधित टॅंकरवर जीपीएस प्रणाली लावण्यात आली आहे का ? तो त्या प्रणालीवर दिसतो आहे का ? बांधकाम विभागाकडून देण्यात आलेले अंतर आणि प्रत्यक्षात होणारे अंतर याचा ताळमेळ बसतो का ? दैनंदिन फेऱ्यांची संख्या आणि प्रत्यक्षात होणाऱ्या फेऱ्या यासह त्याअनुषंगाने आवश्‍यक त्या बाबींची तपासणी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com