गावच्या इलेक्‍शनची हवा तापली: उमेदवारांनी साधली सुटीची संधी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

प्रचाराचा धुमधडाका ः फेऱ्या, बैठका, चर्चांनी गावकुसार रंगत 
आता शेवटचे तीन दिवस बाकी,वातावरण अजून तापणार

सांगली :  जिल्ह्यातील 152 गावांत ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्यापैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अन्य ठिकाणी प्रचाराचा शेवटचा टप्पा जवळ येत असल्याने वेग आला आहे. आज रविवारची सुटी साधून उमेदवारांनी "घर टू घर' प्रचाराचा धडाका लावला. बैठका, फेऱ्या, चर्चांनी गावचे वातावरण एकदम तापले. प्रचार पत्रके, वाहनांतून लाऊड स्पीकरवर प्रचार आणि सोशल मिडियातून एकमेकांना डिवचणारे व्हिडिओ चर्चेत आले आहेत. गावच्या इलेक्‍शनची हवा चांगलीच तापली आहे. 

141 गावांत 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. छोट्या छोट्या प्रभागांत विभागलेले मतदार, आठ दिवसांत प्रचारासाठी किमान दोन ते तीन फेऱ्या झाल्या पाहिजेत, यासाठी झटणारे उमेदवार यामुळे रंगत आली आहे. सत्ताधारी पॅनेलकडून उभारलेले लोक गेल्या पाच वर्षातील विकासावर बोलत आहेत. विरोधात लढत असणारे गावात काहीच झाले नाही असे सांगत आहेत. पिण्याचे पाणी, गटारीची स्वच्छता, रस्त्यांची अवस्था, एलईडी दिवे आदी विषय ऐरणीवर आहेत. काही गावांत गैरव्यवहार झाले आणि त्याची चौकशीही लागली. त्या मुद्यांवर वातावरण तापवण्याचा प्रयत्नही सुरु आहे. 

आता शेवटचे तीन दिवस बाकी आहेत. या काळात वातावरण अजून तापणार आहे. एकेक मतासाठीचा संघर्ष आहे. बहुतांश निकाल हे अगदी काठावरचे असतात. काही ठिकाणी समान मतदान होते, असाही अनुभव आहे. त्यामुळे एकेक मत पदरात पाडून घेण्यासाठी नमस्कार, चमत्कार सगळे होणार आहे. 

हेही वाचा- विजयापर्यंत पोचण्याचा राजमार्ग : मोठी कुटुंबं गळाला लावण्याचे प्रयत्न! -

प्रचार साहित्याने रंगत 

गावच्या प्रचारात चिन्हांनी मोठी रंगत आणली आहे. शिटी चिन्ह असणाऱ्या प्रभागात शिटीचा आवाज घुमतोय. कपबशी चिन्हवाल्यांनी कुठेही चहाला गेल्यानंतर कपबशीतच द्या, अशी फर्माइश सुरु केली आहे. टीव्ही चिन्ह असणाऱ्यांनी सकाळी टीव्हीला नमस्कार करून प्रचार सुरु केलाय. गॅस सिलिंड चिन्ह असणाऱ्यांना मात्र वाढलेल्या सिलिंडर दराची चिंता लागली आहे. 

संपादन - अर्चना बनगे

 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election atmosphere in sangli