२५ हजार हेक्टर वरील द्राक्ष पीक बाधित

ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे द्राक्ष शेती संकटात
grapes
grapessakal media

तासगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे द्राक्ष शेती संकटात सापडली असून जिल्ह्यातील सुमारे २५ हजार हेक्टर वरील द्राक्ष पीक बाधित झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाने मणीकुज, द्राक्षगळ आणि विविध रोगांच्या तडाख्यात यावर्षी द्राक्षपीक सापडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ५ ते २० ऑक्टोबर दरम्यान छाटणी झालेल्या बागा विशेष प्रभावित झाल्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत सतत ढगाळ वातावरण, अधून मधून पडणारा पाऊस, आज पुन्हा ढगाळ वातावरण आणि थंडगार वारे असे वातावरण तयार झाल्याने त्याचा मोठा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने तासगाव पलूस, खानापूर मिरज भागातील शेकडो एकर बागांमध्ये फळकुज आणि मणीगळ झाल्याने अशा द्राक्ष बागांना ७० टक्क्यांहून अधिक फटका बसला आहे. अशा द्राक्षबागायतदारांचे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरावड्यात छाटणी झालेल्या बागा आणि नव्या जातींच्या बागांवर फळकुज मोठ्याप्रमाणावर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. फळकुजी बरोबरच डाऊनी मिलेड्यु आणि भुरी यासारख्या रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला असून त्यावरील औषधांचे दिवसातून दोन दोन स्प्रे घेण्याची वेळ आली आहे. शिवाय दररोजच्या बदलत्या हवामानामुळे औषधे मारूनही डाऊनी आटोक्यात येताना दिसत नसल्याने पावसात बचावलेले द्राक्ष शेतकरी धास्तावले आहेत.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन टीम पाहणी करणार

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्थेच्या डॉ. सोमकुवर आणि डॉ. शहा यांनी रविवारी जिल्ह्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या द्राक्षशेतीची पाहणी केल्याची माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक राजेंद्र कुंभार यांनी दिली. पलूस निमणी या ठिकाणच्या द्राक्ष बागांना भेटी दिल्या. नव्याने विकसित झालेल्या आणि विशेषतः लांब मण्यांच्या द्राक्ष जातींना फळकुज आणि द्राक्षगळ होण्याचा मोठा फटका बसला आहे.

द्राक्षपिकाचे यावर्षी अवकाळी आणि वातावरण बदलामुळे न भरून येणारे नुकसान झाले असून शासनाने तातडीने दखल घेण्याची आवश्यकता आहे. मात्र सरकार पातळीवर अजून कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही. किमान पंचनामे होऊन झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com