"स्वरसाक्षी'ने लावले "चार चॉंद'! सकाळ शॉपिंग महोत्सवाचा शानदार समारोप

"स्वरसाक्षी'ने लावले "चार चॉंद'! सकाळ शॉपिंग महोत्सवाचा शानदार समारोप

नगर : सकाळ शॉपिंग महोत्सवाचा रविवारी (ता. नऊ) समारोप झाला. सुमधुर मराठी गाण्यांच्या सोबतीला उडत्या चालीची हिंदी गाणी अन्‌ सोबत गझला, भावगीते व भक्तिगीतांचा नजराणा रसिक नगरकरांना मेजवानी देऊन गेला. अतुल दिवेनिर्मित "स्वरसाक्षी' ग्रुपने स्वत:कडील खजाना रसिकांच्या पदरात घालताना रसिकांची फर्माईशदेखील तेवढ्याच ताकदीने सादर केली. त्यामुळे अखेरच्या दिवशी टाळ्या अन्‌ शिट्यांच्या गजरात रसिक नगरकरांचे कानही ही गाणी ऐकून तृप्त झाले.

प्रशांत पाटील गडाख यांची उपस्थिती 
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळ शॉपिंग महोत्सवाचा रविवारी (ता. 9) समारोप झाला. महेश अंचितलवार यांच्या बहारदार निवेदनामुळे या कार्यक्रमात आगळाच रंग भरला. वैशाली कुर्तडीकर व डॉ. अनघा मारावार यांच्या गोड आवाजातील गाणी रसिकांना भावली. त्यांच्या सोबतीला धनंजय जळगावकर, अंकुश बोर्डे, नितीन इंगळे, विनोद वाव्हळ व श्रीराज कुलकर्णी यांनी दिलेले संगीतही अफलातून होते.

चिठ्ठी आयी है...
"ऐसी लागी लगन' या भजनाने "स्वरसाक्षी'ची मैफल सुरू झाली. दिवे यांनी सुरवातीलाच रसिकांची फर्माईशदेखील पूर्ण केली जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे उपस्थित रसिकांनीदेखील मोठ्या प्रमाणात अपेक्षित असलेल्या गाण्यांच्या चिठ्ठ्या दिवे यांच्याकडे पाठविल्या. त्यातून "तुम्हावर केली मी मर्जी बहाल', "जीव रंगला', "चंद्र आहे साक्षीला', "निसर्ग राजा', "मेंदीच्या पानावर', "ऐ जिंदगी गले लगा ले', "चांदी जैसा रंग', "सुन्या सुन्या मैफलीत', "निले निले अंबर', "होश वालों को', "चिठ्ठी आयी है' आदी लावण्या, गझला, भावगीते दिवे यांच्या टीमने गाऊन रसिकांच्या फर्माइशी पूर्ण केल्या. "स्वरसाक्षी'मधून नगरकरांना हिंदी-मराठी गाण्यांसोबत प्रथमच भावगीते, भक्तिगीते, गझला आणि लावण्यादेखील ऐकायला मिळाल्या. 

पुढील काही दिवस पाय इकडेच वळतील..! 
गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकालगत असलेल्या तांबटकर मळा मैदानावर सहा फेब्रुवारीपासून सकाळ शॉपिंग महोत्सव रंगला. त्यात सहभागी झालेल्या अनेक उत्पादक व वितरकांनी पुढील वर्षीचे बुकिंग लगेच करा, असा आग्रह धरला.

उत्पादक, वितरक काय म्हणतात...

नेटके नियोजन व व्यवस्थापन, तसेच ग्राहकांच्या प्रतिसादामुळे नवी बाजारपेठ मिळाल्याचा आनंदही अनेक वितरक व उत्पादकांनी व्यक्त केला. रविवारी (ता. 9) रात्री समारोपाच्या वेळी अनेकांनी "पुढील काही दिवस या मैदानाकडे पाय आपोआप वळतील', अशी भावना व्यक्त केली. सकाळ शॉपिंग महोत्सवासोबत एक घट्ट नाते तयार झाल्याची भावना त्यातून व्यक्त झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com