सांगलीला मोठा दिलासा; पण लढाई कायमच! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

सांगली जिल्ह्यातील कोरोनाची भीतीची छाया काहीशी दूर झाली आहे. लढाई अजूनही बाकी आहे. धोका कायम आहे; मात्र पुढच्या लढाईसाठी एक उसंत नक्की मिळाली आहे. सुमारे तीन आठवड्यांनंतरचे हे चित्र अंतिम विजयाचे नसले तरी आश्‍वासक नक्की आहे. 

सांगली जिल्ह्यात गेल्या महिन्यात 21 मार्चला कोरोनाचे एकाच दिवशी चार रुग्ण निष्पन्न झाले. रुग्ण इस्लामपूरचे असले तरी राज्याच्याच केंद्रस्थानी आला सांगली जिल्हा. 22 मार्चला देशव्यापी जनता कर्फ्यूची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. एकूणच भीतीच्या गडद छायेत जिल्ह्यातील यंत्रणेची कोरोना आपत्तीविरोधातील लढाई सुरू झाली. आता गेल्या वीस दिवसांत कोरोनाची रणभूमी ठरलेल्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एकूण 26 रुग्णांपैकी आता अवघे दोन रुग्ण आता उरले आहेत. प्रशासकीय यंत्रणेने जिद्दीने ही लढाई सुरू ठेवली आहे. त्याच वेळी जिल्हावासीयांनी अपूर्व असा संयम दाखवला आहे. त्यातून आता किमान जिल्ह्यातील भीतीची छाया काहीशी दूर झाली आहे. लढाई अजूनही बाकी आहे. धोका कायम आहे; मात्र पुढच्या लढाईसाठी एक उसंत नक्की मिळाली आहे. सुमारे तीन आठवड्यांनंतरचे हे चित्र अंतिम विजयाचे नसले तरी आश्‍वासक नक्की आहे. 

भयछायेतून इस्लामपूरने घेतली उसंत 

इस्लामपूर  : गेल्या 21 मार्चला शहर हादरले. बातमीच तशी होती. जग जागेवर थांबवणारा कोरोनाचा विषाणू शहरात घुसला होता. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर एका क्षणात हॉटस्पॉटमध्ये आले. एकाच कुटुंबातील चार रुग्ण आढळल्याने शहर सुन्न झाले. मात्र, आज बरोबर वीस दिवसांनंतर त्या साखळीबाहेरचे रुग्ण न आढळल्याने शहराने थोडी उसंत घेतल्याचे जाणवते. भीती निवळून आम्ही लढू शकतो, हा आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे.

हज यात्रेला गेलेल्या कुटुंबातील चौघांसह सुमारे 25 जण बाधित झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गेले वीस दिवस 70 ते 80 हजार लोकसंख्या भीतीच्या छायेत वावरत होती. ही जिल्ह्यातील कोरोनाची सुरवात होती. जणू या आजाराचे केंद्रच शहर झाले. शहराची मुख्य बाजारपेठ म्हणजे गांधी चौक आणि भाजी मंडई. एकूण कुटुंब 38 लोकांचे. प्रशासनाने हा परिसर तातडीने सील केला. त्यात बफर झोन आणि कंटेन्मेंट एरिया असे वर्गीकरण केले. या भागातील दीड किमी अंतरातील 11 हजार लोकसंख्या बंदिस्त केली. दरम्यान, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी वापरात नसलेली बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाची इमारत तातडीने सोयीसुविधांसह वापरात आणली. त्यात 31 जणांना ठेवले. 1608 कुटुंबे आणि 7631 नागरिकांवर प्रशासनाने अक्षरशः वॉच ठेवला. 

जवळील दीड किमी भागात 31 आरोग्य पथके तैनात करून सकाळ, संध्याकाळी प्रत्येकाची घरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू केली. यात 393 लोकांना निश्‍चित करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले. यांच्यासाठी 16 स्वतंत्र पथके होती. या भागातील एकालाही बाहेर जाऊ दिले नाही की आत येऊ दिले नाही. फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरू होत्या आणि त्याही घरपोच केल्या गेल्या. गरज वाटल्यास एकावेळी एकालाच बाहेर जाऊ दिले. ध्वनिक्षेपकावर ही सारी लोकसंख्या चालत होती. 29 ते 31 मार्चदरम्यान तर शहराला एखाद्या घराला कुलूप लावावे असे बंदिस्त केले. त्यामुळे प्रशासनाला उपाययोजनांसाठी शंभर टक्के उसंत मिळाली. त्या तीन दिवसांनंतर जवळपास तशीच स्थिती 14 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. 
जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या जयंत पाटील यांचे होमग्राऊंड इस्लामपूर कोरोनामुळे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यांच्यासह नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील अशा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत करीत आज शहराला उसंत मिळावी अशा टप्प्यावर आणून सोडले आहे. अर्थात, धोका संपलेला नाही; मात्र भीतीचे वातावरण नक्कीच निवळले आहे. 

कोरोनाविरोधातील कृती कार्यक्रम 

  • बाधित कुटुंबातील लोकांचे तत्काळ विलगीकरण 
  • बाधितांच्या संपर्कातील दुय्यम व तृतीय साखळीतील लोकांचेही विलगीकरण 
  • संभाव्य समूह संसर्गाचे ठिकाण ओळखून अशा व्यक्ती जागेवरच स्थानबद्ध 
  • संसर्गजन्य परिसरात आशा वर्करमार्फत आरोग्य तपासणीची मोहीम 
  • संशयितांच्या निरीक्षणाबरोबर शहरात येणाऱ्यांवर कडेकोट निर्बंध लादले 
  • सामासिक अंतर ठेवून वर्तन करण्याबाबत शहरात व्यापक जागृती 

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची "मिरज टीम'ला शाबासकी 

मिरज : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी कोरोनाविरोधातील लढाईचा मुकाबला करणाऱ्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील टीमचे कौतुक केले. जिल्ह्याची रुग्णसंख्या 26 पर्यंत पोहचल्यानंतर वीस दिवसांच्या अथक परिश्रमानंतर त्यातील 24 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर देशमुख यांनी या मोहिमेतील सर्व प्रमुख शिलेदारांचे अभिनंदन केले आहे. विशेष अधिकारी डॉ. पल्लवी सापळे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. आजच्या संकट प्रसंगातही टीमने कोरोनामुक्तीचा आनंद साजरा केला. 
संपूर्ण जिल्हा कोरोना रुग्णांमुळे राज्यात चर्चेचा झाला होता; मात्र नव्याने रुग्ण न आल्याने "कोरोना' विरोधातील लढाईचा "मिरज पॅटर्न' आता विशेष चर्चेत आला. 

मुंबईतील ग्रॅंड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्‍टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली याच महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विनायक सावर्डेकर आणि डॉ. प्रशांत होवाळ यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने 28 मार्चपासून यंत्रणा ताब्यात घेत कामाला सुरवात केली. सीटी स्कॅन, एमआरआय, लिक्विड ऑक्‍सिजन, सोनोग्राफी, डायलिसिस व पंधरा बेडचे आय.सी.यू. सज्ज ठेवण्यात आले. याशिवाय कोविड-19 तपासणी केंद्र तातडीने उभारून ते सुरूही करण्यात आले होते. आता या रुग्णालयात कोविडग्रस्त फक्त दोन रुग्ण उरले आहेत. तेही बरे होतील, असा विश्‍वास वैद्यकीय टीमच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांनी व्यक्त केला. 

वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, मुंबईतील जे. जे. समूह रुग्णालयाच्या कोविड 19 समन्वयक विनिता सिंगल, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सांगलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नानंदकर यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे यश मिळाल्याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी या सर्वांचे आभार मानले. त्याचा आनंद आज महाविद्यालय परिसरातही व्यक्त झाला. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी शाबासकीची थाप दिल्याबद्दल परिचारिका आणि सफाई कर्मचाऱ्यांनी डॉ. सापळे यांची भेट घेऊन अभिनंदन केले. 

लॉकडाउन, विलगीकरण, इतर सूक्ष्म नियोजनामुळे जिल्ह्यातील कोरोना संकटाला तूर्त रोखता आले आहे. या काळात नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणेने दाखवलेले धैर्य मोलाचे आहे. कोरोनाच्या समूह संसर्गाला रोखण्याची ही लढाई अजूनही सुरूच आहे. रुग्ण ओळख, विलगीकरण आणि परिसर छाननी या त्रिसूत्रीने दिलासा मिळाला आहे; मात्र यापुढेही गाफील न राहता सर्वांनी लढायचे आहे. तरच आपला विजय होणार आहे.'' 
जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली. 

याच जिद्दीने काम करायचे आहे
प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिक एकदिलाने काम करीत आहेत. प्रशासन दक्ष आहे. सर्वांनी सामासिक अंतर ठेवूनच यापुढेही वर्तन करायचे आहे. नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे. यापुढेही आपल्याला याच जिद्दीने काम करायचे आहे. धोका कायम आहे याचे भान सुटता कामा नये.'' 
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली. 

प्रसंगी युद्धासाठी आपल्याला तयार राहावे लागेल

लढाई जिंकली; पण पुढचे युद्ध होऊ नये असे वाटते. 28 मार्च ते 10 एप्रिल हा कालावधी परीक्षा पाहणाराच होता. मिरज शासकीय रुग्णालयातील सहकारी डॉक्‍टर, परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच ही पहिली लढाई जिंकली असली तरी प्रसंगी युद्धासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. ती वेळच येऊ नये असे मात्र मनापासून वाटते.'' 

- डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great relaxation to Sangli; But the battle is still on...