गटबाजी, गैरव्यवहार यांनी "झेडपी' बेजार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या 2012 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकहाती विजय मिळविला होता; मात्र 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील राजकारणाला कलाटणी मिळाली. त्यातच भर म्हणून 2015 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या कारभाऱ्यांची मनेही दुभंगली गेली. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या विकासकामांवर झाला. याशिवाय वेगवेगळ्या विभागांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांनीही जिल्हा परिषद चर्चेत राहिली.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटबाजीवर यामुळे शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय शिंदे व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी "राष्ट्रवादी'ला रामराम करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. जिल्हा पातळीवर पक्षातील गटातटाच्या राजकारणामुळे हा बदल घडला. 2015 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत परिचारक यांना भाजपने पुरस्कृत केले. त्या वेळी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळपास निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी पक्षाचा "व्हिप' डावलून परिचारक यांना मतदान केले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड यांचे बंधू व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांचा पराभव झाला. या पराभवामुळे जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मने दुभंगली गेली. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या विकासकामांवर झाल्याची चर्चाही सुरू राहिली. आमदार परिचारक यांना मानणाऱ्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुकेशिनी देशमुख व जयमाला गायकवाड यांच्या दुभंगलेल्या मनांना जोडण्याचे काम उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी केले.

माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी कॉंग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 2012 मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या त्यांच्या समर्थक जिल्हा परिषद सदस्यांची अडचण झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेमधील कॉंग्रेसचे संख्याबळ घटले.

जिल्हा परिषदेत गौण खनिज, समाजकल्याण विभागाचे बोगस वसतिगृह, शिक्षकांचे अपंग प्रमाणपत्र यासारखे गैरव्यवहार गाजले. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी 39 ग्रामसेवकांना निलंबित करून जबरदस्त धक्का दिला होता. त्याचबरोबर आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांचा विषयही अनेकदा सभागृहामध्ये चर्चिला गेला.

पक्षीय बलाबल
एकूण जागा-68
राष्ट्रवादी कॉंग्रेस-34
कॉंग्रेस-18
स्थानिक आघाड्या-16

Web Title: grouping & scam in zp