नगरमुळंच आलंय हे सरकार, पालकमंत्री मुश्रीफ यांनी थोपटली पाठ

अमित आवारी
Friday, 21 February 2020

नगर ः ""राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडे करून पक्ष वाढविण्याचे काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 12 जागांपैकी नऊ जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपक्षांनी जिंकल्या. त्यामुळे सध्याचे राज्यातील सरकार आणण्यात नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे,'' असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

हेही वाचा - विखे पाटील तर आमचेच, चर्चा रंगली

नगर ः ""राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडे करून पक्ष वाढविण्याचे काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 12 जागांपैकी नऊ जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपक्षांनी जिंकल्या. त्यामुळे सध्याचे राज्यातील सरकार आणण्यात नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे,'' असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

हेही वाचा - विखे पाटील तर आमचेच, चर्चा रंगली

पालकमंत्री झाल्यानंतर आज त्यांनी पहिल्यांदाच जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, दादा कळमकर, प्रताप ढाकणे, अशोक भांगरे, संजीव भोर, मंजूषा गुंड, शारदा लगड, निर्मला मालपाणी, सोमनाथ धूत आदी उपस्थित होते. 

मुश्रीफ म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजप व शिवसेना महायुतीच्या बाजूने लागला. त्या वेळी आम्ही विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता करून घेतली होती. त्यानंतर चार-पाच दिवसांत घराबाहेर पाऊस व टीव्हीवर खासदार संजय राऊत अशी परिस्थिती निर्माण झाली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन वळवून तीन पक्षांचे सरकार तयार केले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कितीही वल्गना केल्या तरी शरद पवार, सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असेपर्यंत काही होणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार, त्यांनी केलेली कामे हे आपले फार मोठे भांडवल आहे. कुणाजवळ काहीही असो "हमारे पास पवार साहब है'. राष्ट्रवादीला चांगली खाती मिळालेली आहेत हे शरद पवार यांचे यश आहे.'' 

सरकार आपले वाटेल, असे काम करा 
जोपर्यंत कार्यकर्त्यांना मानसन्मान देणार नाही, तोपर्यंत कार्यकर्त्यांना बळकटी व हुरूप येणार नाही. राज्यातील विविध समित्यांची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. गेल्या पाच वर्षांत लोकांना सरकार आपले वाटत नव्हते. लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर लोकांना सरकार आपले वाटेल. पैसे देऊन काम होते हे विचार लोकांच्या मनातून काढून टाका.

लोकांना हे सरकार आपले वाटेल असे काम करा. चांगले काम केले तर चांगला प्रतिसाद मिळतो, हे दिल्ली विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे, असा मंत्रही मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना दिला. 

प्राजक्‍त तनपुरे म्हणाले, ""राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळावी यासाठी राज्य शासन सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. मीही सामान्य कार्यकर्त्यापासून येथपर्यंत पोचल्याने कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कोणती बटणे दाबायची याची कल्पना असल्याचे सूचक उद्‌गारही तनपुरे यांनी काढले. 
राजेंद्र फाळके यांनी प्रास्ताविक केले. संजय कोळगे यांनी सूत्रसंचालन केले. 

मित्रपक्षांना सांभाळून घेत काम करा 
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सर्व मित्रपक्षांना सांभाळून बरोबर घेऊन काम करावे लागणार आहे. शिर्डी, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर व मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर या संस्थांमधील जागावाटप अजून व्हायचे आहे, असा सूचक टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Musharraf praised Nagar NCP