esakal | दलपतचं पुन्हा ‘केम छो...’ भरकटलेला बेघर पोहचला गुजरातला
sakal

बोलून बातमी शोधा

gujrat

दलपतचं पुन्हा ‘केम छो...’ भरकटलेला बेघर पोहचला गुजरातला

sakal_logo
By
- शैलेश पेटकर shaileshpetkar२@gmail.com

सांगली : येथीपुष्पराज चौकात गंभीर जखमी अवस्थेत एक तरूण मदतीच्या अपेक्षेत होता. सावली बेघर निवारा केंद्राच्या टीमने धाव घेतली. रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले. तो तरूण पुर्ण बरा झाल्यानंतर त्याला गावाची आठवण आली. त्या तरूणास त्याच्या मूळ गावी पाठविण्यात आले. गुजरातची ती ‘सावली’ मिळाल्यानंतर तो तरूण सुखावला आणि सावली केंद्राचे भरभरून आभार मानले.

अधिक माहिती अशी, की दलपत बंजारा असे त्या तरूणाचे नाव. पसत्तीशीतील हा तरूण. गुजरात राज्यातील बलसारा हे त्याचे गाव. मजूरीसाठी तो सांगली दाखल झाला. परंतू लॉकडाउन असल्याने हाताला कोणतेही काम नव्हते. पोटाची आग विझवण्यासाठी तो वाटसरू दिल ते खायचा. तीन महिन्यापुर्वी येथील पुष्पराज चौकात त्याचा जोरदार अपघात झाला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. वाहनचालक पसार झाल्याने घटनेची नोंद पोलिसांत झाली नाही.

हेही वाचा: हातगेघर धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस गती

दरम्यान, जखमी अवस्थेतील दलपतला काहींनी पाहिले. त्यानंतर सावली बेघर निवारा केंद्राचे संचालक मुस्तफा मुजावर यांना माहिती दिली. ते आणि त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी धावली. त्यावेळी दलपत हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. प्रचंड वेदना त्याला होत होत्या. सांगायचे कोणाला?, अशी त्याची अवस्था होती. हे सारे पाहुन मुजावर यांनी त्याला तत्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन महिने त्याच्यावर त्याठिकाणी उपचार झाले. या काळात मुजावर यांनी वरचेवर त्याची पाहणी व विचारपुस केली. तब्येत ठीक झाल्यानंतर तो सावली केंद्रात दाखल झाला. इथल्या वातावरणामुळे त्याला मायेची उब मिळाली. याचवेळी मुजावर यांनी त्याच्या कुटुंबियांचा शोध सुरू ठेवला.

दलपतने दिलेल्या माहितीनुसार तो गुजरातमधील बलसारा इथला असल्याचे समोर आले. त्यानंतर मुजावर यांनी याबाबतची माहिती बलसारा येथील काहींना विचारणा केली. खात्री पटल्यानंतर त्याला मुळ गावी सोडण्याची तयारी झाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला गुजरातला पाठविले. गुजरातला आल्यानंतरचा त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सावली आणि इन्साफच्या टीमचे दलपतने भरभरून आभार मानले. या कार्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांनी प्रोत्साहन दिले. प्रकल्प अधिकारी ज्योती सरवदे, सावलीचे निखील शिंदे, वंदना काळेल, सचिन कदम, रेहमत मुजावर, रफीक मुजावर या टीमचा सहभाग होता.

दोनशेवर व्यक्ती मूळ गावी

सावली बेघरी निवारा केंद्रात बेघरांना हक्काचा निवारा दिला जातो. दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानातंर्गत हे केंद्र चालविले जाते. सद्यस्थितीत याठिकाणी ७४ बेघरांना निवारा देण्यात आला आहे. गेल्या अडीच वर्षात सावली आणि इन्साफ फौंडेशनकडून तब्बल २२४ जणांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्यात आले आहे, असे संचालक मुस्तफा मुजावर यांनी सांगितले. वर्षातून दोन ते तीन वेळा त्या व्यक्तींची चौकशीही केंद्राकडून केली जाते.

loading image
go to top