Crime : मोळे येथे पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडेखोरांचे पलायन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Crime : मोळे येथे पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडेखोरांचे पलायन

मांजरी : मोळे (ता. कागवाड) येथे घरात कोणी नसल्याचे पाहून मंगळवारी (ता. 16) रात्री दरोडेखोरांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील 15 तोळे (150 ग्रॅम) सोन्याचे दागिने, अर्धा किलो (500 ग्रॅम) चांदीची वस्तू व वीस हजाराची रोकड असा ऐवज लंपास केल्याची घटना मोळे (ता. कागवाड) येथे मंगळवारी (ता. १६) रात्री घडली असून सदर घटना बुधवारी (ता. १७) सकाळी निदर्शनास आली. दरम्यान, पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडेखोरांनी पलायन करण्यात यश मिळवले. ऐनापुर येथे एकाच रात्री १३ घरात चोरीची घटना ताजी असतानाच या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा: 'काशी-मथुरा बाकी है!' मथुरेतील मशिदीत बसवणार श्रीकृष्णाची मुर्ती; हिंदू महासभेची धमकी

याबाबत घटनास्थळ व कागवाड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी तुलसी विवाह असल्याने मोळे येथील रहिवासी सिध्दराय रुपानवर हे तुलसी विवाह संपून शेतातील घरात राहण्यास गेले. दरोडेखोरानी हीच संधी साधून त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा मोडून घरात प्रवेश केला. घरातील15 तोळे (150 ग्रॅम) सोन्याचे दागिने, अर्धा किलो (500 ग्रॅम) चांदीच्या दागिन्यांसह वीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. याचवेळी गावांतील अन्य पाच घरावरही अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा घातला असून घरातील मौल्यवान वस्तू व इतर साहित्य लंपास केले आहेत. रात्रीच्या वेळी काही युवकांना गावात चोरीच्या सदर घटना निदर्शनास येताच ते पाहण्यासाठी गेले असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तेथून पलायन केल्याची घटना प्रत्यक्षदर्शी युवकांनी सांगितली. घटनास्थळास अथणीचे मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. गिरीश, अथणीचे मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसनगौडा, कागवाडचे पोलिस उपनिरीक्षक बी. एम. रबकवी यांनी भेट देऊन अधिक तपास सुरू ठेवला आहे.

हेही वाचा: राज्यात रुग्णसंख्येत अंशत: वाढ; तर 32 रुग्णांचा मृत्यू

दरम्यान सोमवारी (ता. १५) रात्री शेजारील ऐनापूर गावात एकाचवेळी तेरा बंद घराचा दरवाजा तोडून मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना ताजी असतानाच शेजारील गावात अशी घटना घडल्याने नागरिकांतून भीतीचे वातावरण पसरले आहे. कागवाड पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलिस यंत्रणा निष्क्रिय बनल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वारंवार होणारया चोरी व दरोड्यांचा पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. ऐनापूर येथे पोलिस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

loading image
go to top