मच्छिंद्रगडच्या इतिहासाला शिवकालीन तोफा देणार उजाळा

शिवकुमार पाटील
बुधवार, 19 जून 2019

किल्लेमच्छिंद्रगड - शिवकालापासून सुमारे ३५० वर्षांहून अधिक काळ किल्लेमच्छिंद्रगड गावच्या परिसरात आणि डोंगर कपारीत मातीआड बुजलेल्या, अस्ताव्यस्त पडलेल्या शिवकालीन तोफांचा शोध घेऊन त्यांची साफसफाई करून त्या येथील सद्‌गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर पुनर्स्थापना करण्याचे काम सांगली येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पार पाडले.

किल्लेमच्छिंद्रगड - शिवकालापासून सुमारे ३५० वर्षांहून अधिक काळ किल्लेमच्छिंद्रगड गावच्या परिसरात आणि डोंगर कपारीत मातीआड बुजलेल्या, अस्ताव्यस्त पडलेल्या शिवकालीन तोफांचा शोध घेऊन त्यांची साफसफाई करून त्या येथील सद्‌गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर पुनर्स्थापना करण्याचे काम सांगली येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पार पाडले. प्रतिष्ठानतर्फे गडाची स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून, त्यातही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवरायांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली. पुढे इ.स.१६९३  मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता. त्यावेळी याचा किल्लेदार होता देवीसिंग. १२ नोव्हेंबर १६९३  रोजी औरंगजेब तख्त्तेखांवर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला. तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला. त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे मराठेशाहीच्या अस्तानंतर १८१८ नंतर कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून ताब्यात घेतला. मच्छिंद्रगडाचा खूप मोठा इतिहास अज्ञातच आहे.

गावातीला सुतार मेटाजवळ शिवकालीन तोफा  जमिनीखाली गाडल्या गेल्याची माहिती होती. त्या आधारे सह्याद्री प्रतिष्ठानच्या अवधूत लाड, सचिन भोसले, मनोज माने, अमित झांबरे, प्रशांत झांबरे, नागेश जाधव, उमेश जाधव, प्रकाश पाटील, स्वप्नील पाटील, अनिकेत घाडगे, अनिकेत पाटील, वैभव देशमुख, सतीश पाटील, संतोष भोसले, अमरजित जाधव, जगदीश जगदाळे या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत जमिनीखाली गाडलेला हा इतिहासकालीन ठेवा समाजासमोर नव्याने आणला.  सर्वांनी मेहनतीने सुमारे दीड हजार फूट उंचीवर या तोफा खांद्यावरून नेल्या. तेथील मंदिरासमोर त्यांची स्थापना केली. 

६० वर्षांपूर्वी उडाले होते तोफगोळे
शंकर बाबू साळुंखे, रामचंद्र राघू मोरे, शंकर बाळू साखरे आणि (कै.) राजाराम बंडू कदम या मित्रांनी गावच्या खाणीत सुरुंगासाठी वापरली जाणारी दारू या तोफांमधून उडवल्याची माहिती ग्रामस्थ सांगतात. तेव्हा तोफेचा गोळा येडेमच्छिंद्र गावच्या शिवारात पडला होता. परिसर दणाणून गेला होता. त्याची पोलिस चौकशीही झाली होती. त्या वेळी ज्येष्ठांनी हा पोरखेळ असल्याचे सांगत घडल्या प्रकारावर पडदा टाकला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gun will brushup history of Machchindrangad