नामी शक्‍कल लढवून गुटखा विक्री सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

सातारा - गुटखा बंदीबाबत अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलल्याने शहरातील बहुतांश पान टपऱ्यांतून गुटखा गायब झाला आहे. मात्र, कार्यालयांच्या वेळेआधी व नंतर गुटखा विक्री करण्याची शक्कल काही दुकानदारांनी लढवल्याने गुटख्याचा दरवळ अद्यापही येतोच आहे. परिणामी बंदीची पूर्ण अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीच काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

सातारा - गुटखा बंदीबाबत अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलल्याने शहरातील बहुतांश पान टपऱ्यांतून गुटखा गायब झाला आहे. मात्र, कार्यालयांच्या वेळेआधी व नंतर गुटखा विक्री करण्याची शक्कल काही दुकानदारांनी लढवल्याने गुटख्याचा दरवळ अद्यापही येतोच आहे. परिणामी बंदीची पूर्ण अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीच काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

गुटख्याच्या दुष्परिणामांमुळे शासनाने राज्यात गुटखाबंदी लागू केली. या निर्णयाला अनेक वर्षे झाली तरी, राज्यातून गुटखा हद्दपार करण्यात यश आलेले नाही. राज्यात गुटखा तयार होत नसला तरी, बाहेरील राज्यांतील त्याची आयात मोकळेपणाने सुरू आहे. त्यामुळे शहरासह अगदी ग्रामीण भागातही बिनदिक्कतपणे बाहेरील गुटखा पोचतो आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांकडून याबाबतच्या कारवाया होत असल्या तरी, गुटखा विक्री बंद करावी, असे विक्रेत्यांना वाटत नव्हते. बंदीतील गुटखा विक्रीतून मिळणाऱ्या फायद्यामुळे विक्रेते त्याकडे पाठ फिरवायला तयार नाहीत.

अशा परिस्थितीत अन्न व औषध प्रशासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात गुटखा विरोधी मोहीम तीव्र केली आहे. सुरवातीला गुटखा विक्री करणाऱ्यांवर खटले पाठविले जायचे. त्या प्रक्रियेत फारसा त्रास होत नसल्याने विक्रेत्यांवर या कारवायांचा फरक पडत नव्हता. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करताना संबंधित दुकानाला सील ठोकण्यास सुरवात केली. परिणामी विक्रेत्यांना न्यायालयात जाऊन दुकानाचे सील काढण्याचे आदेश आणावे लागू लागले. या प्रक्रियेसाठी त्यांना त्रास होऊ लागला. वकिलांना द्याव्या लागणाऱ्या पैशाच्या भुर्दंडाबरोबर या प्रक्रियेला किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी जातो. एवढ्या काळात विक्रेत्याला आपला धंदा बंद ठेवावा लागत आहे. त्याचबरोबर न्यायालयात गुटखा विक्री न करण्याबाबत प्रतिज्ञापत्रही द्यावे लागते. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे विक्रेत्यांच्या मानसिकतेवर त्याचा चांगला परिणाम होऊ लागला.

दुकाने सील करण्याची कारवाई थंडावल्यावर गुटखा विक्रेत्यांनी काही दिवसांत पुन्हा डोके वर काढले होते. शहरात पुन्हा खुलेआम गुटखा विक्री सुरू झाली होती. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत अन्न व औषध प्रशासन विभागाने गुटखा विक्रेत्यांवर पुन्हा कारवाई सुरू केली. त्याचबरोबर वारंवार पाहणी सुरू केली आहे. त्यामुळे कारवाईचा पूर्वानुभव विचारात घेता विक्रेत्यांना त्याची धडकी भरली आहे.

कार्यालयीन वेळा महत्त्वाच्या
शासकीय कार्यालयीन वेळांव्यतिरिक्त सकाळी व रात्री गुटखा विक्री करण्याची शक्कल काही विक्रेत्यांनी लढविली आहे. त्यातही ग्राहक पाहूनच आहे का नाही, हे उत्तर ठरत आहे. दिवसभरासाठी म्हणून गुटख्याचे शौकिन या काळातच जास्तीची खरेदी करत आहेत. त्यामुळे गुटखा बंदीच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. अशा विक्रेत्यांना लगाम लावण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला वेगळी शक्कल लढवावी लागणार आहे.

Web Title: Gutkha Sailing Crime