सहकारी बॅंकांवर हॅकर्सचा डल्ला

सूर्यकांत वरकड
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये असलेल्या को-ऑपरेटिव्ह (सहकारी) बॅंकांचे खाते हॅक करून लाखो रुपये लुटल्याचे समोर आले आहे.

नगर : राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये असलेल्या को-ऑपरेटिव्ह (सहकारी) बॅंकांचे खाते हॅक करून लाखो रुपये लुटल्याचे समोर आले आहे. या टोळीचे धागेदोरे परदेशात असण्याची शक्‍यता आहे. हॅकर्सने राज्यातील सहकारी बॅंका टार्गेट केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

अधिक माहिती अशी, की नगर शहरातील आयडीबीआय बॅंकेमध्ये नगर शहर सहकारी बॅंकेचे खाते हॅक करून लाखो रुपये चोरले होते. त्या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी काल मुंबई येथून एकास अटक केली. बॅंक खाते हॅक करून पैसे चोरणारे सुरवातीला बोगस कागदपत्रे तयार करून राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते उघडतात. त्या खात्यावर हवाल्याचे अथवा अन्य पैसे ट्रान्स्फर करून व्यवहारही करतात. 

ज्या राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये सहकारी बॅंकेचे खाते आहे, त्यावर या हॅकर्सचा डोळा असतो. त्यानंतर राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या अधिकाऱ्यामार्फत अथवा अन्य मार्गाने बॅंकेच्या मॅनेजरचा बॅंकेचा युजर आयडी व पासवर्ड मिळवितात. त्यावर एखादी लिंक टाकून सर्व्हर मिळवितात. म्हणजे नगर येथील शाखेचे सर्व्हर थेट मुंबई येथील शाखेला जोडले जाते. त्यानंतर त्या सर्व्हरमधून सहकारी बॅंक खात्याची इत्थंभूत माहिती मिळवितात. सहकारी बॅंकेच्या खात्यातून हॅकर्स बनावट खात्यात पैसे वर्ग करतात. सुरवातीला दहा ते शंभर रुपये वर्ग करतात. त्यानंतर शनिवार व रविवारची सुटी लक्षात घेऊन बॅंक खात्यातून लाखो रुपये बोगस खात्यात वर्ग करतात. 

दरम्यान, त्या बनावट कागदपत्रांद्वारे उघडलेल्या खात्याची पैसे काढण्याची मर्यादा वाढून घेतात. जेणेकरून ते पैसे एटीएमद्वारे काढता येतात आणि नेट बॅंकिंगद्वारे दुसऱ्या खात्यावर वर्ग करून ते पैसे हडप करतात. 

या गुन्ह्याच्या पद्धतीमध्ये स्थानिक आरोपींसह नायजेरियन आरोपींचाही समावेश आहे. त्यामुळे बॅंक खाते हॅक करून पैसे लुबाडणाऱ्यांचे कनेक्‍शन थेट परदेशात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

सहकारी बॅंकाच टार्गेट का? 

राज्यातील अनेक सहकारी बॅंकांची रोकड राष्ट्रीयीकृत बॅंकेत पडून असते. त्या बॅंकेच्या खात्यातून दहा ते पाच लाख चोरी गेल्यास त्याची कोणीही वाच्यता करीत नाही. कारण सहकारी बॅंक अगोदरच बदनामीला घाबरते. त्यामुळे हॅकर्सकडून सहकारी बॅंकाच टार्गेट केल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे. 

बॅंकेचे खाते हॅक करून पैसे चोरल्याच्या अनेक तक्रारी सायबर पोलिस ठाण्यात येत आहेत. सायबर पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. अन्य गुन्हे येत्या काही दिवसांत उघडकीस येतील. 

- संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hacker buckets on fellow banks