कोल्हापूर अर्बन बॅंकेला हॅकरकडून ६८ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

एक नजर

  • दि कोल्हापूर अर्बन बॅंकेची ६८ लाख ८८ हजारांची रक्कम सायबर गुन्हेगाराने अवघ्या तीन तासांत उचलली रक्कम
  • डिजिटल पेमेंट सिस्टीमचा गैरवापर करून हॅकरचे कृत्य
  • शाहूपुरीतील एचडीएफसी बॅंकेच्या शाखेतून हॅकरने केला हा प्रकार
  • मुख्य अधिकारी बाजीराव दगडू खरोशे (वय ५०) यांनी पोलिस ठाण्यात दिली याबाबतची फिर्याद. 

कोल्हापूर - डिजिटल पेमेंट सिस्टीमचा गैरवापर करून दि कोल्हापूर अर्बन बॅंकेची ६८ लाख ८८ हजारांची रक्कम सायबर गुन्हेगाराने अवघ्या तीन तासांत परस्पर रक्कम उचलली. शाहूपुरीतील एचडीएफसी बॅंकेच्या शाखेतून हॅकरने हा प्रकार केला. याबाबतची फिर्याद मुख्य अधिकारी बाजीराव दगडू खरोशे (वय ५०) यांनी पोलिस ठाण्यात दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - दि. कोल्हापूर अर्बन को-ऑप बॅंकेत मुख्य अधिकारी म्हणून बाजीराव खरोशे (वय ५०, रा. नवीन वाशीनाका) काम पाहतात. त्यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान विभागाचीही जबाबदारी आहे. या बॅंकेचे एचडीएफसी बॅंक शाहूपुरी शाखेत चालू खाते आहेत. त्या खात्यावरील दोन वेगवेगळ्या अकौंट क्रमांकावरून आरटीजीएस (रिअर टाईम ग्रॉस सेटलमेंट), एनईएफटी (नॅशनल इलेक्‍ट्रॉनिक फंडस्‌ ट्रान्स्फर) आणि आयएमपीएस (इमिजेट पेमंट सर्व्हिस), ईसीओएमएम (इकॉनॉमिक कॉमर्स), एटीएम असे व्यवहार केले जातात.

शुक्रवारी (ता.१९) बॅंकेला गुड फ्रायडेची सुटी होती. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने एचडीएफसी बॅंकेमधून अर्बन बॅंकेच्या खात्यावरील ६७ लाख ८८ हजार ४१ रुपये परस्पर काढून घेतले. काल सकाळी बॅंक सुरू झाल्यानंतर अर्बन बॅंकेतील कनिष्ठ अधिकारी शिल्पा मोहिते व मीनाक्षी लुकतुके यांना बॅंकेच्या खात्यावरून ६७ लाख ८८ हजार रुपयाच्या रकमा ऑनलाईन वर्ग झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती मुख्य अधिकारी खरोशे यांना दिली. त्यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. 

तत्काळ पैसे देणारी यंत्रणा 
आयएमपीएस म्हणजे ग्राहकांच्या सेवेसाठी पैसे ट्रान्स्फर करण्याची एक व्यवस्था आहे. त्याआधारे बॅंकेचे ऑनलाईन व्यवहार व एटीएमचे व्यवहार केले जातात. हीच सिस्टीम हॅक करून किंवा तिचा गैरवापर करून ६७ लाख ८८ हजारांची रोकड ऑनलाईन वर्ग करण्यात आली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

साडेतीन तासांत ३४ व्यवहार
भामट्याने इमिजेट पेमेंट सिस्टीमचा १९ एप्रिलला सकाळी ११ः०८ ते दुपारी २.२८ यावेळेत गैरवापर गेला. अवघ्या साडेतीन तासात त्याने अर्बन बॅंकेच्या दोन वेगवेगळ्या खात्यावरील ३४ व्यवहारांतून ६७ लाख ८८ हजार ४१ रुपये वर्ग केले. वर्ग झालेल्या आयएमपीएस क्रमांकावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: Hacker stolen 68 Million from Kolhapur Urban Bank