जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचे अर्धे लक्ष दुचाकीवर 

दौलत झावरे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये कर्मचारी व अभ्यागतांची दुचाकी वाहने पार्क केली जातात. मात्र, या आवारातून दुचाकीचोरीच्या घटना कायम घडत असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत.

नगर ः जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये कर्मचारी व अभ्यागतांची दुचाकी वाहने पार्क केली जातात. मात्र, या आवारातून दुचाकीचोरीच्या घटना कायम घडत असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अर्धे लक्ष कामात अन्‌ अर्धे लक्ष दुचाकीकडे असते. काहींनी तर कामातून वेळ काढत पार्किंगमधून एक फेरफटका मारायला सुरवात केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या आवारातून दुचाकीचोरीच्या घटना वारंवार घडतात. याबाबत पोलिस ठाण्यात अनेकदा तक्रारी जातात. त्यातील बोटावर मोजता येतील, इतक्‍याच दुचाकीचोरीच्या घटनांचा तपास लागला आहे. त्यात नव्याने चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. जिल्हा परिषदेच्या आवारात सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली असली, तरी अशा घटना घडत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आवारातून एक दुचाकी चोरी झाल्याची घटना घडल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आणखीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीचोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. 

चोरीच्या घटना वारंवार होऊ लागल्याने आता कर्मचाऱ्यांचे अर्धे लक्ष कामात अर्धे लक्ष दुचाकीकडे असते. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा पार्किंगमध्ये जाऊन आपली वाहने व्यवस्थित आहेत ना? याची पाहणी करून पुन्हा आपल्या कामात व्यस्त होत आहेत.

दुचाकीचोऱ्यांना आळा बसावा, यासाठी कर्मचारी संघटना येत्या दोन दिवसांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व आवारात असलेले सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी करणार आहेत. 

नाममात्र शुल्कावर पार्किंग सुरू करा 

जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या मोकळ्या जागेत कर्मचाऱ्यांसह अभ्यागत आपली दुचाकी वाहने येथे पार्किंग करतात. या पार्किंगमध्ये नाममात्र शुल्क आकारून पार्किंग करण्याची सुविधा करावी, केल्यास चोरीच्या घटनांना आळा बसू शकतो, असे मत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

बेशिस्तीला शिस्त लावा 

जिल्हा परिषदेच्या आवारात दुचाकी वाहनांची पार्किंगमध्ये बेशिस्तपणे दुचाकी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहने पार्किंग करणाऱ्यांवर सुरक्षारक्षकांमार्फत कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

पार्किंगमध्ये पावसाळ्यात पाणी 

दुचाकी वाहने ज्या ठिकाणी पार्किंग केली जात आहे. त्या ठिकाणी पावसाळ्यात कायमच पाणी साठते. या पाण्यातच कर्मचाऱ्यांना आपली वाहने पार्क करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परिस्थिती आजही कायम आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half the attention of the employees in the Zilla Parishad is on the bike