दिव्यांगांवर शस्त्रक्रियेसाठी हवेत ४४ लाख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुख्यमंत्र्यांकडे मागणी; ३६ मुलांवर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक

सातारा - दिव्यांग मुलांना विशेष म्हटले जात असले तरी त्याकडे ‘विशेष’ स्वरूपात लक्ष दिले जात नाही. मात्र, सातारा जिल्हा परिषदेने अशा विकलांग मुलांवर विशेष लक्ष देत त्यांच्या वारंवार विविध आरोग्याच्या तपासण्या घेतल्या. त्यातून ३६ दिव्यांग मुलांवर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक असल्याचे पुढे आले असून, त्यासाठी मुख्यमंत्री साह्यता निधीतून त्यासाठी ४४ लाख ४५ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा परिषदेने केली आहे.

सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण विभागाने जिल्हा शासकीय रुग्णालय, सांगली येथील अण्णासाहेब शिंदे-म्हैशाळकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डिसेंबर २०१५ मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचे शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये ११८ अस्थिदोष असणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७७ विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक असल्याचे आढळून आले. त्यासाठी ९५ लाख ५१ हजार रुपयांची आवश्‍यकता भासून आली. परंतु, त्यातील काही मुलांच्या पालकांनी शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली नाही. तथापि ३६ मुलांच्या पालकांनी शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्यासह कार्यक्रम पर्यवेक्षिकांची बैठक घेवून शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मुख्यमंत्री साह्यता निधीतून ४४ लाख ४५ हजारांचा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मुख्यमंत्री साह्यता निधी कक्षाकडे हा प्रस्ताव पाठविला आहे. 

मुख्यमंत्र्यांकडे लक्ष
कऱ्हाडमधील सहा, साताऱ्यातील चार, खंडाळ्यातील चार, माणमधील एक, फलटणमधील चार, खटावमधील दोन, पाटणमधील सहा, कोरेगावमधील सात, महाबळेश्‍वरमधील दोन अशा ३६ मुलांचा समावेश आहे. त्यांच्यावर विविध शस्त्रक्रिया करायच्या असून, त्यासाठी चार मुलांवर प्रत्येकी सर्वाधिक दोन लाख ९९ हजार रुपये शस्त्रक्रियेचा खर्च येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: handicaped child surgery important