esakal | पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी लढविली नामी शक्कल
sakal

बोलून बातमी शोधा

He fought against the police to save his name

हातात फलक घेवूनच त्यानी खानापूर ते बेळगाव असा प्रवास केला. वाटेत ज्या-ज्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडविले, त्या ठिकाणी फलक दाखवून त्यांनी आपली सुटका करून घेतली. त्या व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती, त्या जखमेवर पट्टी बांधण्यात आली होती. ती जखम पाहिल्यावर पोलिसांनाही ती व्यक्ती खरे बोलत असल्याची खात्री पटली.

पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी लढविली नामी शक्कल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - लॉक डाऊनच्या काळात पोलिसांनी सुरू केलेल्या लाठीहल्ल्याचा धसका अनेकांनी घेतला आहे. पण पोलिसांच्या लाठीहल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खानापूर तालुक्‍यातील एका व्यक्तीने चांगली शक्कल लढविली. त्या व्यक्तीवर कुत्र्याने हल्ला करून चावा घेतला होता. त्याला बेळगावच्या जिल्हा रूग्णालयात जावून उपचार घ्यायचे होते. पण दुचाकीवरून खानापूर ते बेळगाव हा प्रवास करताना पोलिसांकडून अडवणूक होवू शकते, पोलिस लाठीहल्ला करू शकतात हे त्याने ओळखले. शिवाय ती व्यक्ती मराठी भाषिक होती व त्याला कन्नड बोलता येत नव्हते. यावर त्याने नामी शक्कल लढविली. त्याने आपल्या कन्नड भाषिक मित्राकडून एक फलक तयार करून घेतला. 'मला कुत्रा चावला आहे, मला सोडा' असा कन्नड मजकूर त्यावर लिहीला. आपल्या एका मित्राला त्याने सोबत घेतले. त्याला दुचाकीवर मागे बसविले व त्याच्या हातात तो फलक दिला. 

हातात फलक घेवूनच त्यानी खानापूर ते बेळगाव असा प्रवास केला. वाटेत ज्या-ज्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडविले, त्या ठिकाणी फलक दाखवून त्यांनी आपली सुटका करून घेतली. त्या व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती, त्या जखमेवर पट्टी बांधण्यात आली होती. ती जखम पाहिल्यावर पोलिसांनाही ती व्यक्ती खरे बोलत असल्याची खात्री पटली. शुक्रवारी येथील जिल्हा रूग्णालयात जावून त्या व्यक्तीने उपचार करून घेतले व पुन्हा खानापूरला निघून गेले. लॉक डाऊनची घोषणा झाल्यापासून बेळगाव, कर्नाटक राज्य तसेच देशभरात पोलिसांकडून होत असलेल्या लाठीहल्ल्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे पोलिसांबद्दल सर्वांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. अर्थात लॉक डाऊन काळात अकारण शहरात फिरणाऱ्यांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद मिळत असला तरी कधी-कधी निष्पाप लोकही त्याला बळी पडत आहेत. त्यामुळे रूग्णांचीही उपचारासाठी बाहेर पडताना मोठी गोची होत आहे. खानापूरातील त्या व्यक्तीचीही अशीच समस्या झाली. कुत्र्यांने चावल्यामुळे तातडीने उपचार घेणे आवश्‍यक होते, पण बेळगावपर्यंत जायचे कसे? असा प्रश्‍न त्या व्यक्तीसमोर होता. पण त्या व्यक्तीने फलक तयार करून पोलिसांचे लक्ष वेधले व जिल्हा इस्पितळापर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. शिवाय वेळेत उपचारही घेतले.