दोन वेळच्या जेवणासाठी त्याची २४ किलोमीटरची पायपीट, शिवबाचे मावळे भागवतात १२००जणांची भूक

RAHURI ANNACHATRA
RAHURI ANNACHATRA

राहुरी : सात जणांचे कुटुंब. मोलमजुरी हाच उदरनिर्वाहाचा व्यवसाय. कोरोना विषाणूची आपत्ती कोसळली. देशभरात लॉक डाऊन झाला. मजुरी मिळणे बंद झाले. आठ दिवसात घरात खडखडाट झाला. कुटुंबाची उपासमार सुरू झाली. सहा किलोमीटरवर अन्नछत्र सुरू असल्याचे समजले. सात जणांचे फुड पॅकेट घेण्यासाठी पायपीट सुरू झाली. रोज दुपारी व रात्री जाण्या-येण्याची २४ किलोमीटरची पायपीट सुरु झाली. कुटुंबाची भूख भागविण्यासाठी कुटुंबप्रमुखाचा आटापिटा अंत:करण पिळवटणारा ठरत आहे.

रमेश गणपत संसारे (रा. लाख रस्ता, देवळाली प्रवरा) असे अन्नछत्रात पायपीट करणाऱ्या कुटुंब प्रमुखाचे नाव. मोलमजुरी करायची. तुटपुंज्या रोजंदारीच्या पैशातून रोजचा किराणा, भाजीपाला आणायचा.  कुटुंबातील सात जणांचा उदरनिर्वाह करायचा. ज्या दिवशी हाताला काम नाही. त्या दिवशी चूलीतील धूर बंद असतो. तेंव्हा घराला उपवास घडतो. गरजा अत्यंत मर्यादित. तरी, त्या पूर्ण होत नाहीत. घरात साधी सायकल नाही. एक छोटासा मोबाईल. रोजंदारी मिळण्यासाठी संपर्काचे साधन. मिळेल तेथे. मिळेल ते काम करायचे. असा त्यांचा नित्यक्रम.

कोरोनाची आपत्ती अचानक कोसळली. देशभरात लॉक डाऊन झाला. मजुरी कामे बंद झाली.‌  संसारे बेरोजगार झाले. घरात बसून रहावे लागते. त्यामुळे, आठ दिवसात त्यांची छोटीशी पुंजी संपली. घरातील अन्नधान्य संपले.  किराणा सामानाच्या पत्र्याच्या डब्यात खडखडाट झाला.  शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून मदत मिळाली नाही. आसपासच्या कुटुंबाची परिस्थिती सुद्धा बेताचीच. सर्व दरवाजे बंद झाले. उपासमार सुरू झाली. राहुरी फॅक्टरी येथील एका नातेवाईकाने शिवबा प्रतिष्ठानच्या अन्नछत्राची माहिती दिली.

रोज दुपारी भर उन्हात घरापासून सहा किलोमीटर जायचे. परत सहा किलोमीटर घरी यायचे. रात्री साडे आठ-नऊ वाजता अंधारात अशीच बारा किलोमीटर पायपीट करायची. दिवसभरात दोन वेळच्या अन्नासाठी संसारे यांची २४ किलोमीटर पायपीट सुरू झाली.

असे चालते अन्नछत्र

कोरोनामुळे सर्वत्र आणीबाणीची स्थिती आहे. रोज उपापोटी झोपणाऱ्यांच्या बातम्या येतात. त्यांच्या पोटाला काहीतरी द्यावे यासाठी हे अन्नछत्र सुरू केलं आहे. यात दररोज सकाळी पाचशे ते सहाशे आणि संध्याकाळीही तेवढेच जेवतात. शिवबाच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांनी पाच ते सहा हजार जमा केले आहेत. शेजारील उच्चभ्रू लोकांच्या कॉलनीतून ते चपात्या किंवा भाकरी जमा करतात. भाजी शेतकऱ्यांकडून विकत आणतात. आणि तांदूळ विकत आणून मसाले भात करतात.

"अन्नछत्रात दुपारी चपात्या व रस्साभाजी, सायंकाळी मसाले भात व एखादी स्वीट डिश असते. सात जणांच्या कुटुंबासाठी पुरेसे फुड पॅकेट मिळते. स्वतःची सायकल नाही.  त्यामुळे, पायी प्रवास करावा लागतो."

- रमेश संसारे, लाभार्थी, देवळाली प्रवरा.

"दोन दिवसापासून रमेश संसारे अन्नछत्रात येत आहेत. दोन वेळेच्या जेवणासाठी त्यांची धडपड पाहून, त्यांच्या कुटुंबाला पुरेसे भोजन त्यांना घरपोच करण्याचे ठरविले आहे. यापुढे, त्यांना पायपीट करावी लागणार नाही.

- आदिनाथ कराळे, अध्यक्ष, शिवबा प्रतिष्ठान, राहुरी फॅक्टरी."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com