पाच लाखांपर्यंत मोफत उपचार 

हेमंत पवार
सोमवार, 30 एप्रिल 2018

कऱ्हाड - अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना पाच लाखांपर्यंतचे आरोग्य उपचार आणि शस्त्रक्रियेचा मोफत लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू असून, संबंधित लाभार्थींची नावे शासनाने सर्व्हे करून निश्‍चित केली आहेत. त्या नावांचे वाचन उद्या (ता. 30) राज्यात एकाचवेळी होणाऱ्या ग्रामसभांत होऊन त्यावर शिक्कोमोर्तब होणार आहे. आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 83 हजार 63 हजार 664 कुटुंबांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. संबंधित कुटुंबासाठी शासनाने टाकलेले हे महत्त्वांकाक्षी पाऊलच ठरणार आहे. 

अत्यल्प उत्पन्न असलेल्या आणि दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना महागडे आरोग्य उपचार परवडत नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयाची पायरी चढून महागडे उपचार घेणे त्यांच्या आर्थिक क्षमतेपलीकडे असते. परिणामी अनेकदा असे उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे, अशा कुटुंबात आरोग्याबाबत जागृतीही नसल्याने त्यांना अनेक आजारांना बळी पडावे लागते. त्याचा विचार करून केंद्र शासनाने राज्य शासनाच्या मदतीने मध्यंतरी झालेल्या सर्व्हेनुसार ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे, ज्या कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे आणि जी कुटुंबे दारिद्य्ररेषेतील यादीत नाहीत मात्र त्यांचे उत्पन्न अत्यल्प आहे, अशा 83 लाख 63 हजार 664 कुटुंबांना पाच लाखांपर्यंचा आरोग्य उपचारांचा लाभ देण्याचे ठरवले आहे. संबंधित लाभार्थींची यादीही शासनाकडे तयार असून, त्या लाभार्थींची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एएनएम, आशा स्वयंसेविका आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. त्यासाठी उद्या ग्रामसभा घेऊन त्यामध्ये गावासमक्ष संबंधित नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

घरी जाऊनही नावनोंदणी  
अनेकदा ग्रामसभेची माहिती न झाल्याने आणि कामामुळे वेळ न मिळाल्याने अनेक कुटुंबांतील व्यक्ती ग्रामसभेस हजर राहत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे त्यांचे यादीतील नाव कमी होऊ नये, याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामसभेस ज्या कुटुंबातील व्यक्ती हजर राहणार नाहीत, अशा कुटुंबांच्या घरी जावून संबंधित अर्जातील माहिती संबंधित नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून भरली जाणार आहे. 

अचूक माहितीसाठी आवाहन 

ज्या कुटुंबांची संबंधित यादीत नावे समाविष्ठ आहेत, त्यांनी अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फाळके यांनी केले आहे. संबंधित अर्जातील माहिती अचूक असेल तर लाभार्थ्याला लाभ घेताना अडचणी येणार नाहीत, अन्यथा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, शिधापत्रिका क्रमांक बदलला तर लाभापासून संबंधित लाभार्थी वंचित राहण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही, असेही डॉ. फाळके यांनी सांगितले. 

Web Title: Health care and surgery free up to five lakh